मंत्री सतीश जारकीहोळी : पत्रकारांशी साधला संवाद
बेळगाव : बेळगाव-चिकोडी लोकसभा मतदार संघातून काँग्रेस पक्षाकडून कोणालाही उमेदवारी देऊन उभे केल्यास त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे. त्या दृष्टीनेच तयारी केली जात आहे, असे जिल्हा पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. येथील जिवेश्वर भवनमध्ये बेळगाव दक्षिण मतदार संघातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सभेदरम्यान पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. बेळगाव-चिकोडी लोकसभा मतदार संघ काँग्रेसच्या ताब्यात घेण्यासाठी कार्यकर्ते व नेत्यांची वारंवार बैठक घेऊन नियोजन केले आहे. राज्यामध्ये काँग्रेसचे वारे वाहत आहेत. त्यामुळे दोन्ही मतदार संघात आपले उमेदवार विजयी होणार याचा आपल्याला विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.
लवकरच उमेदवारांची घोषणा
या दोन्ही मतदारसंघातील अधिकृत उमेदवारांची अद्याप घोषणा झालेली नाही. हायकमांडकडून लवकरच उमेदवारांची घोषणा करण्यात येणार आहे. आपण निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आवश्यक ती तयारी केली आहे. चिकोडी लोकसभा मतदार संघातील सर्व तालुका केंद्रांमध्ये बैठका घेण्यात आल्या आहेत. अथणी तालुक्याला भेट दिलेली नाही. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आमदार सवदी यांच्याशी चर्चा केली आहे. बेंगळूर दौऱ्यानंतर अथणी दौरा करण्यात येईल. बेळगाव लोकसभा मतदारसंघात भाजप नेते शेट्टर यांच्या विरोधात बॅनर अभियान सुरू झाले आहे. त्याच्याशी आपला काहीही संबंध नाही. भाजपकडून कोणताही उमेदवार उभा केल्यास त्या विरोधात समर्थपणे निवडणूक लढवून विजयी होण्याचा आपला उद्देश आहे, असे त्यांनी सांगितले.









