वार्ताहर/किणये
बेळगुंदी येथील रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमी यांच्यावतीने 17 वे मराठी साहित्य संमेलन रविवार दि. 11 रोजी आयोजित करण्यात आले आहे. संमेलन चार सत्रांमध्ये होणार आहे. अध्यक्षस्थानी सातारा येथील डॉ. यशवंत पाटणे राहणार आहेत. संमेलनाची जोरदार तयारी करण्यात आली असून या संमेलनासाठी बेळगुंदीनगरी सज्ज झाली आहे.
कोरोना महामारीच्या संकटामुळे गेली दोन वर्षे बेळगुंदी साहित्य संमेलन झाले नाही. यंदा मात्र कोरोनाचे संकट कमी झाल्यामुळे सतरावे मराठी साहित्य संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनाला महाराष्ट्रातील साहित्यिक, कवी यांची उपस्थिती राहणार आहे रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमीच्या कार्यकर्त्यांनी आठ दिवसांपासून परिसरात संमेलनाची जागृती केली आहे. शनिवारी मरगाई मंदिर मरगाई देवस्थान परिसरात भव्य शामियाना उभारण्यात आला आहे. मंडप सजावटीचे काम शनिवारी उशिरापर्यंत सुरू होते. या संमेलनात परिसरातील नवोदित कवींनाही व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मराठी भाषा आणि संस्कृती यांचे जतन करण्यासाठी 16 वर्षांपासून बेळगुंदीत मराठी साहित्याचा जागर सुरू आहे.
ग्रंथ दिंडी, उद्घाटन कार्यक्रम
संमेलनाच्या पहिल्या सत्रामध्ये ग्रंथ दिंडी, उद्घाटन व अध्यक्षीय भाषण होणार आहे. मरगाई देवस्थान परिसराला ज्येष्ठ साहित्यिक कै. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले साहित्यनगरी असे नाव देण्यात आले आहे. सकाळी 8 वाजता रवळनाथ मंदिर येथून ग्रंथ दिंडीला सुरुवात होणार आहे. उद्घाटक म्हणून जि. पं. माजी सदस्य मोहन मोरे राहणार आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून रामचंद्र पाटील राहणार आहेत.
रवळनाथ मूर्ती पूजन, ग्रंथ पूजन, पालखी पूजन व ग्रंथ दिंडीचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
दुपारी एक ते दीडपर्यंत स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे. दीड वाजता दुसऱ्या सत्राला सुरुवात होणार आहे. साहित्य आणि वर्तमान काळ या विषयावर परिसंवाद होणार आहे. या सत्राच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समीक्षक प्रा. वैजनाथ महाजन राहणार आहेत. या सत्रामध्ये सांगली येथील प्रा. दि. बा. पाटील, इस्लामपूर येथील डॉ. दीपक स्वामी, मिरज येथील प्रा. भीमराव धुळूबुळू उपस्थित राहणार आहेत.
तिसऱ्या सत्र कवी संमेलन सत्राला दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. अध्यक्षस्थानी मिरज येथील डॉ. अनिता खेबुडकर राहणार आहेत. या सत्रात निवडक कवी आपल्या कविता सादर करणार आहेत. दुपारी 4.30 वाजता चौथे सत्र होणार असून या सत्रात ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ हा कार्यक्रम होणार आहे. मुंबई येथील प्रा. विसुभाऊ बापट कार्यक्रम सादर करणार आहेत.
संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. संमेलनासाठी परिसरातील शाळांना आमंत्रणे देण्यात आली असून या शाळांचे विद्यार्थी ग्रंथ दिंडीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. दिवसभर होणाऱ्या या साहित्य संमेलनाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमीच्यावतीने कळविण्यात आले आहे









