हेस्कॉमने विद्युतबिलांचा गोंधळ दूर करण्याची मागणी
वार्ताहर /किणये
एकीकडे राज्य सरकारने घरातील 200 युनिट वीजपुरवठा मोफत देणार, असे जाहीर केले आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेला ही दिलासादायक बाब ठरणारी आहे. मात्र भरमसाट वाढीव विद्युत बिले दिल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. बेळगुंदी ग्रामस्थांनी वाढीव बिलांबाबत बुधवारी सकाळी हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना चांगलाच जाब विचारला आहे. तसेच हेस्कॉमने वाढीव विद्युतबिलांचा गोंधळ दूर करावा, अन्यथा आम्ही बील भरणार नाही, असा इशारा बेळगुंदी ग्रामस्थांनी दिला आहे. सरकारने आपल्या गॅरंटी योजनांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना वीजपुरवठा मोफत देणार असे जाहीर केले आहे. याची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार असेही सांगण्यात आले आहे. बेळगुंदी येथे अनेकांच्या घरातील वीज बिलांमध्ये दुप्पट व तिपटीने वाढ झाली असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. वीज बिलांमध्ये अचानक वाढ कशी झाली, असा प्रश्न सर्वसामान्य जनता करीत आहे. विद्युत बिले ज्यादा आकारण्यात आली असल्यामुळे सर्वसामान्य लोकांना हे परवडणारे नाही. लोकांची निव्वळ दिशाभूल करण्यात येत असल्याच्या तक्रारीही ग्रामस्थ व महिलांनी केल्या आहेत. आम्ही गावकरी कोणीही वीजबील भरणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. बुधवारी सकाळी उचगाव विभागाचे हेस्कॉमचे अधिकारी सचिन हे बेळगुंदी गावात आले होते यावेळी बेळगुंदी ग्रामस्थ, पंचकमिटी व गावातील काही महिलांनी हेस्कॉमच्या या अधिकाऱ्यांना वाढीव बिलाबद्दल जाब विचारला. यावेळी ग्रामस्थ कमिटीचे माजी अध्यक्ष सोमाण्णा गावडा, ग्रामस्थ कमिटीचे अध्यक्ष शट्टूपा चव्हाण, धुळोबा पाटील, किरण मोटरकर, सुरज चौगुले, राजू किणयेकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.









