वार्ताहर/ किणये
बेळगुंदी गावातील नागरिकांनी ग्रामदैवत श्री देव रवळनाथ मंदिर जीर्णोद्धाराचा संकल्प केला होता. आणि ग्रामस्थांचा हा संकल्प पूर्ण पूर्णत्वास आला आहे. या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला रविवार दि. 11 रोजीपासून सुरुवात होणार आहे. रविवारी सकाळी गावात देव रवळनाथ मूर्ती व कळस मिरवणूक काढण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी अवघी बेळगुंदी नगरी सज्ज झाली आहे. श्री रवळनाथ मंदिराचे बांधकाम सुंदर असे करण्यात आलेले आहे. मंदिराचे बांधकाम अरभावी दगड व चिरांमध्ये करण्यात आले आहे. यामुळे सर्वांसाठी हे मंदिर आकर्षक दिसून येत आहे. रवळनाथ देवस्थान जागृत असल्यामुळे या भागातील भक्तांची गर्दी या सोहळ्याला मोठ्या संख्येने होणार आहे. ग्रामस्थांनी एकजुटीने या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी प्रयत्न केलेले आहेत. ग्रामस्थ व पंचकमिटीच्या वतीने मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कामकाज हाती घेण्यात आले. दानशूर व्यक्ती देणगीदार यांच्या माध्यमातून मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे.
रविवारी सकाळी दहा वाजता विठ्ठल रखुमाई मंदिर येथून रवळनाथ मूर्ती व कळस मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा गजर होणार आहे. तसेच महिला मोठ्या संख्येने डोक्यावर कलश घेऊन सहभागी होणार आहेत.
विविध मान्यवरांच्या हस्ते या मिरवणुकीचे पूजन करून मिरवणूक सोहळ्याला सुरुवात करण्यात येणार आहे. ही मिरवणूक विठ्ठल रखुमाई मंदिर येथून सुरुवात होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक, हुतात्मा चौक, कलमेश्वर गल्ली, पाटील गल्ली, गावडे गल्ली, चव्हाट गल्ली मार्गे रवळनाथ मंदिर येथे येणार आहे. तसेच सोमवार दि. 12 रोजी हरिपाठ व इतर कार्यक्रम होणार आहेत. 13 रोजी गोमाता पूजन, कुमारीका पूजन व विविध कार्यक्रम होणार आहेत. सायंकाळी विठ्ठल पाटील यांचे प्रवचन होईल. रात्री पुंडलिक महाराज देहूकर यांचे कीर्तन होणार आहे. दि. 14 रोजी मूर्ती प्रतिष्ठापना, कळसारोहण आदी कार्यक्रम होणार आहेत. दुपारी एक वाजता माहेरवासीनींचा सत्कार होणार आहे. सायंकाळी प्रवचन व दीपोत्सव, रात्री कीर्तन कार्यक्रम होणार आहे. विश्वनाथ पाटील महाराज यांचे प्रवचन व पूर्णानंद काजवे महाराज यांचे कीर्तन होणार आहे.
दि. 15 रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मंदिराचा उद्घाटन सोहळा होणार आहे .त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे ग्रामस्थ व पंचकमिटीच्या वतीने कळविण्यात आले आहे.









