बेळगाव : बेळगावमधील शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांनी बेळगाव ते केदारनाथ असा सायकल प्रवास पूर्ण केला. मुतगा येथील प्रतिक पाटील व बाळेकुंद्री येथील पवन पाटील या दोघांचे मंगळवारी दुपारी बेळगावमध्ये आगमन झाले. शिवप्रतिष्ठानतर्फे या दोघांचेही भव्य स्वागत करण्यात आले. 18 ऑगस्ट रोजी पहाटे 4 वाजल्यापासून त्यांनी या प्रवासाला सुरुवात केली. 18 दिवसांच्या खडतर प्रवासातून त्यांनी केदारनाथ गाठले. मंगळवारी या दोन्ही युवकांचे बेळगाव रेल्वे स्थानकावर जंगी स्वागत करण्यात आले. रेल्वे स्थानकापासून शिवाजी उद्यानापर्यंत बाईक रॅली काढण्यात आली. शिवप्रतिष्ठानचे प्रांतप्रमुख किरण गावडे व जिल्हा प्रमुख
विश्वनाथ पाटील यांच्या हस्ते त्या दोघांचाही फेटा, शाल, श्रीफळ व 32 मण सुवर्ण सिंहासनाचे स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. भिडे गुरुजींच्या प्रेरणेतून दुर्गराज रायगडावर 32 मण सुवर्ण सिंहासनाची पुनर्स्थापना करण्यात येणार आहे. या सुवर्ण सिंहासनासाठी केदारनाथला साकडे घालण्यात आले. या प्रवासामध्ये सुवर्ण सिंहासनाबाबत देशभर जागृती करण्यात आली. किरण गावडे यांनी या दोघांचेही कौतुक करत इतर युवकांनीही त्यांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी तालुका प्रमुख परशुराम कोकितकर, शहर प्रमुख अनंत चौगुले, तालुका कार्यवाह कल्लाप्पा पाटील, विभाग प्रमुख पुंडलिक चव्हाण, गजानन निलजकर, अंकुश केसरकर, प्रवीण मुरारी, प्रमोद चौगुले, प्रफुल्ल शिवलकर, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, किरण बडवाण्णाचे यासह धारकरी उपस्थित होते.









