इंडिगो एअरलाईन्सनेही विमानफेरी केली रद्द, प्रवाशांना मनस्ताप
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावच्या विमानसेवेचे पुरते तीनतेरा वाजले आहेत. एका मागून एक विमानफेऱ्या रद्द केल्या जात असल्याने प्रवासी वैतागले असून आता त्यांनी आपला मोर्चा हुबळी व गोवा विमानतळाकडे वळविला आहे. वारंवार विमानफेऱ्या रद्द होत असल्याने बेळगावची प्रवासी संख्या खालावत असून त्याचा परिणाम व्यवसायावर होत आहे.
स्टार एअरलाईन्सने मागील चार दिवसांत काही विमानफेऱ्या रद्द केल्याने गेंधळाची स्थिती असतानाच आता इंडिगो एअरलाईन्सनेही विमानफेऱ्या रद्द करण्यास सुरुवात केली आहे. 6 फेब्रुवारीची बेळगाव-बेंगळूर विमानफेरी रद्द करण्यात आली असल्याचा संदेश प्रवाशांना देण्यात आला आहे. बेळगाव विमानतळावरून वारंवार विमानफेऱ्या रद्द होण्यामागचे कारण काय? असाही प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. यापूर्वी बेळगावमधून चार ते पाच विमान कंपन्या सेवा देत होत्या. परंतु बेळगावच्या वाट्याच्या विमानफेऱ्या शेजारील हुबळी विमानतळाला देण्यात आल्याने बेळगावच्या फेऱ्या कमी झाल्याचा आरोप करण्यात आला. टप्प्याटप्प्याने अनेक महत्त्वाच्या विमानफेऱ्या कायमच्या रद्द झाल्या. स्पाईस जेट, ट्रू जेट, अलायन्स एअर या कंपन्यांनी बेळगावमधील सेवा थांबविल्या. सध्या इंडिगो व स्टार एअरलाईन्स या दोन कंपन्या सेवा देत आहेत.
विमानफेऱ्या रद्द होत असल्याने प्रवासी शेजारील गोवा विमानतळाला पसंती देत आहेत. प्रवासी संख्या असतानाही केवळ तांत्रिक कारण देत विमाने रद्द केली जात आहेत. यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत असून याबाबत आता लोकप्रतिनिधींनी आवाज उठविणे गरजेचे आहे.









