दोघांना वाचविण्यात यश : हजरत शेख शिराजुद्दीन जुन्नेदी दर्ग्याच्या दर्शनासाठी गेले होते तऊण : बुडालेल्याचा शोध सुरू
वार्ताहर /कुडची
कुडची येथील दर्ग्याच्या दर्शनासाठी आलेला बेळगावातील एक तरुण कृष्णा नदीत बुडाला. आणखी दोन मुले त्याच्याबरोबर नदीत पडली. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या एका तरुणने त्या दोघांना बाहेर काढले तर एकजण बुडाला. त्याचा रात्रीपर्यंत शोध लागला नाही. ही घटना कुडची येथील गड्डे भागात असलेल्या हजरत शेख शिराजुद्दीन जुन्नेदी दर्ग्याजवळ रविवारी दुपारी 3.30 वाजता घडली. हुसेन निसारअहमद अरकट्टी (वय 22) रा. न्यू गांधीनगर, बेळगाव असे बुडालेल्या तरुणचे नाव आहे. तर आतीफ वडीवले (वय 13) व फरीद मुजावर (वय 16) अशी वाचलेल्यांची नावे आहेत. बेळगाव येथील दहा ते बाराजण कुडची येथील हजरत शेख शिराजुद्दीन जुन्नेदी या दर्ग्याचे दर्शन घेण्यासाठी आले होते. बेळगावात हे सर्वजण मोटारींचे पेंटिंग व दुऊस्तीची कामे करतात. एक खासगी वाहन घेऊन हे सर्वजण रविवारी सकाळी बेळगावातून कुडचीत आले होते. येथे आल्यानंतर ते दर्ग्यात दर्शन घेऊन नदीकाठावर असलेल्या घाटाजवळ जेवण करून बसले होते. काहीजण घाटाजवळ नदीकाठावर अगदी जवळ तर काहीजण वरच्या बाजूला बसले होते. यावेळी उभे राहताना अचानक हुसेनचा तोल गेला. यावेळी त्याच्याबरोबर बाजूला असलेले आतीफ व फरीद हेही नदीत पडले. लागलीच वर बसलेल्यांपैकी त्यांचा मित्र असलेला चिंचली येथील कामील सनदी या तरुणाने नदीत उडी मारून या दोन मुलांना बाहेर काढले. तोपर्यंत तिसरा बुडाल्याची कल्पनाच आली नाही. नंतर शोध घेऊनही त्याचा पत्ता लागला नाही. कपडे व चप्पल घाटावर ठेवून ते घाटाच्या शेवटच्या पायरीवर बसून उठताना ते नदीत पडल्याचे त्याच्याबरोबर आलेल्या अन्य तऊणांनी सांगितले. कुडची गावापासून गड्डे भागात हजरत शेख शिराजुद्दीन जुन्नेदी दर्गा आहे. हुसेनसोबत त्याचे वडीलही येथे आले होते. तरुण नदीत बुडाल्याची माहिती मिळताच परिसरातील तरुण व मासेमारी करणाऱ्यांनी नदीत शोध घेतला पण, त्या तरुणाचा शोध लागला नाही. घटनास्थळी कुडची पोलिसांनीही येऊन माहिती घेतली आहे. अद्याप याची नोंद झाली नसली तरी अंधारामुळे रात्री शोधमोहिम थांबवावी लागली.
तिघांना पोहता येत नव्हते
घाटावर बसून काठावर पाण्यात खेळ करताना तिघे नदीत पडले. यातील तिघांनाही पोहता येत नव्हते. त्यातील दोन अल्पवयीन मुलांना चिंचलीच्या तरुणाने वाचविले, पण हुसेन तोपर्यंत दिसेनासा झाल्याने तो बुडाल्याची खात्री झाली. तिघांनाही पोहता येत नसल्याने पाण्याजवळ जाऊन खेळ करणे धोकादायक ठरले.









