बेळगाव : बेळगाव क्रीडा प्रतिनिधी विजापूर जिल्हा सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित बेळगाव विभागीय माध्यमिक आंतरशालीय 17 वर्षाखाली मुलांच्या फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद बेळगाव जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सेंट झेवियर्स हायस्कूल संघाने पटकाविले. या स्पर्धेतील उप-उपांत्यपूर्व सामन्यात बेळगाव जिल्हा संघाने हावेरी जिल्हा संघाचा चुरशीच्या सामन्यात 1-0 असा पराभव केला बेळगाव संघातर्फे एकमेव विजयी गोल गौरव गोदवाणी यांनी नोंदविला. उपांत्य पूर्व लढतीत बेळगाव जिल्हा संघाने सर्वोत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडवत चिकोडी जिल्हा संघावर 2-0 असा विजय मिळविला बेळगाव जिल्हा संघातर्फे अरसलन मुल्लाने अप्रतिम खेळ करत 2 गोल नोंदविले. उपांत्य सामन्यात बेळगाव जिल्हा संघाने गदग जिल्हा संघाचा 1-0 असा पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला. बेळगाव संघाचा एकमेव विजयी गोल तेजसराज निंबनावरने नोंदविला.
अत्यंत चुरशीच्या व अटीतटीच्या अंतिम सामन्यात बेळगाव जिल्हा संघाने बागलकोट जिल्हा संघावर 1-0 असा निसटता विजय मिळवत स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. संपूर्ण सामन्यात दोन्ही संघांनी एकमेकांवर आक्रमक चढाया केल्या शेवटी बेळगाव जिल्हा संघाच्या आनंदने नोंदविलेल्या एकमेव विजय गोलामुळे बेळगाव जिल्हा संघाने स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. विजेत्या बेळगाव जिल्हा संघात अर्जुन सानिकोप, ऊजेन उचगावकर, सुफियान बिस्ती, रेहान शेख, समर्थ भंडारी, माहिद भडकली, तेजसराज निंबनावर, गौरव गोधवानी, अरसलन मुल्ला, ईशान घाटगे, जैन मुल्ला व ओझर रोटीवाले यांचा समावेश आहे. विजेता बेळगाव जिल्हा फुटबॉल संघाला सेंट झेवियर्स स्कूलचे मुख्याध्यापक फादर सिरील बॅग्ज, शाळेचे क्रीडा शिक्षक चेस्टर रोजारिओ, क्रीडा शिक्षिका ज्युलीयट फर्नांडिस यांचे प्रोत्साहन तर ज्येष्ठ फुटबॉल प्रशिक्षक मानस नायक व सलीम किल्लेदार यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभत आहे.









