केंद्राच्या पीएम ई-बस सेवा योजनेंतर्गत मिळणार लाभ
बेळगाव : राज्यात बेळगाव जिल्हा सर्वात मोठा असल्याने दळणवळणही मोठ्या प्रमाणात होते. जिल्ह्यात परिवहन मंडळाच्या बसेसची कमतरता असल्याने नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मात्र आता केंद्र सरकारकडून लवकरच 100 इलेक्ट्रिक बसेस मिळणार असून बेळगाववासियांसह प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे. राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना शहरी व्यवहार राज्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे. राज्यसभेतील खासदार डॉ. विरेंद्र हेगडे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्री तोखन साहू यांनी केंद्र सरकारने पीएम ई-बससेवा योजनेंतर्गत कर्नाटकसाठी 750 बसेस मंजूर केल्या असल्याचे सांगितले आहे.
यामध्ये बेळगाव 100, हुबळी-धारवाड 100, कलबुर्गी 100, मंगळूर 100, म्हैसूर 100, शिमोगा 50, तुमकूर 50, बळ्ळारी 50, विजापूर 50, दावणगेरे जिल्ह्याला 50 बसेस मंजूर झाल्या आहेत. पूर्वी बस खरेदीसाठी खर्चाच्या 50 टक्के खर्च केंद्र व 50 टक्के खर्च राज्य सरकार आणि परिवहन मंडळे समान वाटून घेत असत. मात्र राज्य सरकारने 2025-26 च्या आर्थिक वर्षात एकूण 14750 इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्याची योजना आखली आहे. आता केंद्राच्या 750 बसेसची भर पडली असून याबाबत राज्य सरकार कोणती भूमिका घेते याकडे लक्ष देण्याची गरज आहे. इलेक्ट्रिक बसेस सेवेत दाखल झाल्यास प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. नव्या मॉडेलसह आरामदायी इलेक्ट्रिक बसेसच्या माध्यमातून लांबपल्ल्याच्या मार्गासह नियमित स्थानिक मार्गांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा लाभ होणार आहे. यासाठी राज्य सरकारने लवकरात लवकर पावले उचलण्याची गरज आहे. सध्या प्रवासी संख्येतही वाढ झाली आहे. यामुळे बसेसचीही मागणी वाढली आहे.









