ऊसवाहू वाहने कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता : खड्डे बुजविण्यासाठी निधी नसल्याचे कारण : खड्डय़ांमधून ये-जा करताना कसरत

प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यावरील डांबर वाहून गेला असून ठिकठिकाणी खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. विशेषतः अरगन तलाव परिसरातील गणपती मंदिरशेजारी रस्त्यावर मोठे खड्डे निर्माण झाल्याने अवजड वाहने कोलमडण्याचा धोका निर्माण झाला आहे. ऊसवाहू वाहने कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्मयता असून मोठा अनर्थ घडू शकतो. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याने केलेले रस्ते प्रत्येक पावसाळय़ात वाहून जातात. बेळगाव-वेंगुर्ला रस्त्याचे डांबरीकरण पावसाळय़ापूर्वी करण्यात आले होते. ठिकठिकाणी निर्माण झालेले खड्डे बुजवून रस्ता गुळगुळीत बनविण्यात आला होता. मात्र, पावसाळय़ात संपूर्ण डांबर वाहून गेला असून गांधी चौक ते बाचीपर्यंत रस्त्यावर खड्डेच खड्डे निर्माण झाले आहेत. संपूर्ण रस्त्याची दुरवस्था झाली असून खड्डय़ांची दुरुस्ती करण्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने दुर्लक्ष केले आहे. रस्त्यांच्या विकासासाठी राज्य शासनाने 50 कोटींचे अनुदान प्रत्येक विधानसभा मतदार संघासाठी मंजूर केले आहे.
पावसाच्या पाण्याने रस्ता खराब
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून शहरातील रस्त्यांचा विकास या निधीअंतर्गत करण्यात येत आहे. मात्र, बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी निधी नसल्याचे सांगण्यात येत आहे. अरगन तलाव परिसरातील रस्ता पूर्णपणे वाहून गेल्याने वाहनधारकांना वाहने चालविणे कठीण बनले आहे. गणपती मंदिरशेजारी गतिरोधक निर्माण करण्यात आले आहे. मात्र, या गतिरोधकाजवळ पावसाचे पाणी साचून रस्ता खराब होत आहे. मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्डय़ांमधून ये-जा करताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे.
वेळीच वाहनावर नियंत्रण
मंदिरशेजारी उतार असल्याने खड्डय़ांमधून जाताना अवजड वाहनांना धोका निर्माण झाला आहे. सध्या उसाची वाहतूक मोठय़ा प्रमाणात सुरू असून ऊस वाहने जात असताना या खड्डय़ांमुळे कलंडण्याचा धोका निर्माण झाला आहे. अनेकवेळा ऊस वाहने या ठिकाणी अडकून पडत आहेत. बुधवारी दुपारी ऊस वाहतूक करणारे वाहन कलंडताना थोडक्मयात बचावले. वाहनचालकाने वेळीच वाहनावर नियंत्रण मिळविल्याने मोठा अपघात टळला. असे प्रकार दररोज निर्माण होत असून हा खड्डा जीवघेणा बनला आहे.
या परिसरात दुचाकी वाहनधारकांची नेहमी वर्दळ असते. तसेच गणपती मंदिरात येणाऱया भाविकांची गर्दी असते. याचप्रमाणे ठिकाणी रिक्षा थांबा आणि बसथांबा असल्याने प्रवासी थांबलेले असतात. या सर्वांच्या जीवाला वाहनांचा धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी अनर्थ घडण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.









