आंतर अकादमी फुटबॉल स्पर्धा
गडहिंग्लज
पंधरा वर्षाखालील आंतरराज्य आंतर अकादमी फुटबॉल स्पर्धेत बेळगावचे मँजिक स्पोर्टिंग, मानस फौंडेशन तर यजमान गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल स्कुल ‘अ’ आणि ‘ब’ संघानी आपपल्या गटात सर्वाधिक गुण मिळवून विजयी सलामी दिली. मिरजेचा स्कुल ऑफ फुटबॉल, सोलापूरची मॉडेल अकादमी संघाचे आव्हान संपुष्टात आले.
येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन मार्फत एम. आर. हायस्कुलच्या मैदानावर हि स्पर्धा सुरू आहे. सुरभान पाटील यांनी फुटबॉल किक मारून स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी अभियंता प्रतिक करपे, जयदिप नांदवडे, किरण दस्तुरकर, ओमकार जाधव, सौरभ जाधव उपस्थित होते. युनायटेडचे सचिव दीपक कुपन्नावर यांनी स्वागत केले. आदर्श दळवी यांनी आभार मानले. उदघाटनाच्या सामन्यात गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल स्कुलने मॉडेल अकादमीचा 7-0 असा मोठा पराभव केला. युनायटेडच्या स्वरूप शेटकेने तीन, आलोक पाटीलने दोन तर वेदांत कडुकरने एक करून विजय साकारला. बेळगावच्या मानस फौडेशनने युनायटेड स्कुल ब संघाला 4-1 असे हरविले. मानसच्या मलीद भडकली याने दोन तर ओवीस जमादार आणि आराध्य याने प्रत्येकी एक गोल करून विजयी सलामी दिली.
चुरशीच्या सामन्यात मानस फौंडशनने मिरज स्कुल ऑफ फुटबॉलला 2-1 असे नमविले. मानसच्या रेयान पटवेगार, झियान मुल्ला यांनी तर मिरजेच्या समर्थने एक गोल मारला. अटीतटीचा मँजिक स्पोर्टिंग विरूध्द युनायटेड अ हा सामना 1-1 असा बरोबरीत सुटला.
मँजिकच्या विवेक यादवने तर युनायटेडच्या आलोक पाटीलने गोल केले. मँजिकने मॉडेल अकादमीला 6-2 असे पराजित केले. मँजिकच्या विवेक यादव, सकलेन यांनी प्रत्येकी दोन टिपू, विराटने प्रत्येकी एक गोल मारले. मॉडेलच्या सिध्दार्थ भंडारीने दोन गोल करून चांगली लढत दिली. शेवटच्या सामन्यात युनायटेड ब ने मिरजेचा 7-1 असा एकतर्फी पराभव केला. सुमित पानोरी, ऋषी भोसलेने प्रत्येकी दोन, आर्यन शेटके, रणवीर भालेकर, वेदांत राऊतने प्रत्येकी एक गोल करून उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले.








