बेळगाव: टोमॉटो चोरी करण्यासाठी आलेल्या भामट्याला शेतकऱ्यांनी रंगेहाथ पकडल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील यल्पारट्टी येथे घडली आहे.
शेतकरी कुमार अलगोंड गुडोडगी यांनी आपल्या अर्धाएकर शेतामध्ये टोमॉटोची लागवड केली होती. याआधी काही दिवसापूर्वी २५ किलोचे २०० ट्रे टोमॉटो अचानक चोरीला गेल्याने शेतकरी कुमार अलगोंड गुडोडगी पाळतीवर होते. मंगळवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास एक व्यक्ती त्यांच्या शेतात शिरून टोमॉटोची चोरी करताना शेतकऱ्याने रंगेहाथ पकडले आणि हेल्पलाईन ११२ शी संपर्क साधून त्याला पोलीसच्या स्वाधीन केले. चोरट्याचे नाव भुजप्पा गाणीगेर असे असून यल्पारट्टी गावा पासून जवळच असणाऱ्या सिद्धापूर गावचा तो रहिवासी असल्याचे समजते. हारुगेरी पोलीस स्थानकात या प्रकरणाची नोंद झाली असून पुढील तपास चालू आहे.









