प्रतिनिधी / बेळगावत
बेळगाव शहराच्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गरिबांचे महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगावात सध्या पारा 38 अंशांवर गेला आहे. त्यामुळे अनेक जण घरातून बाहेर पडताना विचार करत आहेत. उन्हाच्या वाढत्या तडाख्यात सर्वसामान्य जनता हैराण होऊ लागली आहे. एप्रिलच्या मध्यावधीत पारा 38 अंशांवर गेला असला तरी येत्या काळात हा पारा 40 अंशांवर जाण्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. उकाड्यामुळे सारे हैराण होताना दिसत आहेत. रात्रीच्या वेळची थंडीही कमी झाली आहे. उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे साऱ्यांनाच सावलीचा आधार घ्यावा लागत आहे. डांबरी रस्त्याऐवजी अलीकडे काँक्रीटचे रस्ते करण्यात आले आहेत. त्यावरून चालताना चांगलेच चटके बसू लागले आहेत. अनेक जण आता गारवा व शीतपेयांकडे वळले आहेत. दुपारी कोणीही घरातून बाहेर पडत नाहीत. दरम्यान, अशीच परिस्थिती राहिल्यास उष्म्यामुळे अनेक आजार उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सर्वसाधारणपणे 15 मार्चनंतर उकाड्यात वाढ झाली. कमाल तापमान 33 अंश सेल्शीयसपासून वाढत गेल्यानंतर उन्हाच्या झळा मोठ्या प्रमाणात बसू लागल्या आहेत. आता कमाल तापमान 38 अंश सेल्शीयसपर्यंत कायम राहिल्यामुळे उकाड्याची तीव्रता न सोसणारीच ठरू लागली आहे. रात्रीच्या वेळी वाढत्या उष्म्यात डासांचे प्रमाण वाढले आहे. डास आणि उष्णता यातून सुटका करून घेण्यासाठी पॅनची गरज भासू लागली आहे. अनेक जण उष्म्यापासून बचाव करण्यासाठी फॅन, एसी व कुलरचा वापर करताना दिसत आहेत. ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी दीड ते दोनपर्यंत जागरण करून वाढत्या उष्म्याचा सामना करण्याची वेळ आली आहे. दिवसा तर उन्हाच्या वाढत जाणाऱ्या झळा जनजीवनच विस्कळीत करणाऱ्या ठरत आहेत. वाढत्या उष्म्यामुळे सरकारी कार्यालयांमध्ये शुकशुकट पसरत आहे. यातच निवडणुकांचे बिगुल वाजल्याने अधिकाऱ्यांना तारेवरच कसरत करावी लागत आहे. अनेकांना तर 24 तास काम देण्यात आल्याने अधिकाऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
उन्हामुळे बाजारपेठेवर परिणाम होऊ लागला आहे. दुपारनंतर तर बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पसरू लागला असून बाजारहाटसाठी सायंकाळच्या वेळीच अधिक जण बाहेर पडताना दिसत आहेत. उन्हामुळे भाजी विक्रेता तसेच इतर व्यावसायिकांना चटके सहन करावे लागत आहेत. सर्वसाधारण शिमगा सणानंतर उष्म्यात वाढ होत जाते. यावर्षीही आता उष्म्यामध्ये वाढ होताना दिसू लागली आहे.









