दररोज 20 ते 25 हजार कामगारांना रोजगार : त्यापाठोपाठ हुक्केरी, खानापूर तालुक्यांचा क्रमांक
बेळगाव :: महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून बेळगाव तालुक्यात विविध विकासकामांना चालना देण्यात येत आहे. त्यामुळे दररोज तालुक्यात 20 ते 25 हजार कामगारांना काम देण्यात येत आहे. मंगळवार व बुधवारी साधारणत: 21 हजारांहून अधिक कामगारांना काम देण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात आता बेळगाव तालुका रोजगार देण्यामध्ये अव्वल ठरला आहे. यापाठोपाठ खानापूर व हुक्केरी तालुक्यांचा क्रमांक लागतो. महात्मा गांधी रोजगार हमी योजना जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यासाठी सरकारने परिश्र्रम घेतले आहेत. राज्यात बेळगाव जिल्ह्याचा प्रथम क्रमांक आला आहे. त्यामुळे सरकारकडून या जिल्ह्याचे विशेष अभिनंदनही करण्यात येत आहे. जिल्ह्यात तब्बल 1 लाख 24 हजार 500 हून अधिक कामगारांना काम देण्यात येत आहे. विविध विभागातून ही कामे पूर्ण झाली तरी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ही योजना राबविली जाते. त्याला प्रतिसादही मोठ्या प्रमाणात मिळू लागला आहे.
विकासाबरोबरच बेरोजगारी दूर करण्यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेला प्रारंभ करण्यात आला. यामध्ये केंद्र सरकारची 50 टक्के तर राज्य सरकारची 50 टक्के रक्कम समाविष्ट असते. यामुळे राज्य सरकारने केंद्राकडून मिळणाऱ्या निधीचा विनियोग करण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत. या योजनेतून नदी, नाल्यांचा गाळ काढणे याचबरोबर विहिरी खोदाई, तलावांची खोदाई यासह इतर कामे करण्यात आली आहेत. रोजगार हमी योजनेंतर्गत सर्वसामान्य जनतेलाही उद्योग मिळणे हा उद्देश जरी असला तरी यामधून विकास होत आहे. विविध गावांमध्ये ग्राम पंचायतीच्या माध्यमातून पाण्याची समस्या दूर करण्यासाठी तलावांची दुऊस्ती करण्यात आली. ही योजना राबविण्यासाठी ग्राम पंचायतींना उद्दिष्टही देण्यात आले आहे. काही ग्राम पंचायतींनी उद्दिष्ट पूर्ण केले नसले तरी बहुसंख्य ग्राम पंचायतींनी ही योजना 100 टक्के राबविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. विशेष करून बेळगाव तालुक्यात मार्कंडेय नदीच्या स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आल्याने कामगारांना काम मिळणे सोयीचे ठरले आहे. ग्राम पंचायत बरोबरच फलोत्पादन खाते, पशुवैद्यकीय खाते, वनखाते कृषी विभागासाठीही ही योजना फायदेशीर ठरली आहे. या योजनेमधून शेतकऱ्यांनी विहीर खोदाई करून घेतल्या आहेत. याचबरोबर पाईप जमिनीतून घालून त्याचा लाभ घेतला आहे. तर वनखात्याने रस्त्याच्या बाजुंनी झाडे लावून ती जगविण्यासाठी या योजनेतूनच प्रयत्न केले आहेत. अनेक बेरोजगारांना या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात झाला आहे. जिल्ह्यात तब्बल 1 लाख 25 हजारांहून अधिक कामगारांना काम देण्यात येत आहे. त्यामुळे यापुढील काळात काम कमी आणि कर्मचारी अधिक अशी गत होतानाची चिन्हे दिसत आहेत.
दररोज 3 कोटी 73 लाख 50 हजारांची कामे
सध्या जिल्ह्यात दररोज 3 कोटी 73 लाख 50 हजारांची कामे दररोज होत असल्याची नोंद आहे. जिल्ह्यात ही योजना बेळगाव बरोबरच हुक्केरी, खानापूर, अथणी, सौंदत्ती, रायबाग, बैलहोंगल येथेही मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
लवकरच उद्दिष्ट पूर्ण करणार
बेळगाव तालुक्यात सध्या 25 हजारांहून अधिक कामगारांना काम देण्याचे उद्दिष्ट आम्ही ठवेले आहे. त्यावर आम्ही भर दिला आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यात आम्ही आघाडीवर असून लवकरच आमचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करणार आहे. सध्या कामगारांना मोठ्या प्रमाणात काम मिळत असल्याने आम्हालाही समाधान वाटत असल्याचे ते म्हणाले.
– ता. पं. कार्यकारी अधिकारी राजेश दनवाडकर
दररोज मिळणारा कामाचा तपशील
तालुका दररोज कामगारांची
होणारी नोंद (साधारणपणे)
- अथणी 8698
- बेळगाव 21174
- बैलहोंगल 8735
- चिकोडी 6628
- गोकाक 5332
- हुक्केरी 15441
- कागवाड 897
- खानापूर 17815
- कित्तूर 5134
- मुडलगी 2766
- निपाणी 2934
- रामदुर्ग 7380
- रायबाग 10415
- सौंदत्ती 11191
- एकूण 124540









