क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
शिक्षण खात्यातर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय माध्यमिक क्रिकेट स्पर्धेत बेळगाव तालुका संघाने बेळगाव ग्रामीण संघाचा 77 धावानी पराभव करून विजेतेपद पटकाविले. आकाश कुलकर्णी, सिद्देश असलकर यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
व्हॅक्सिन डेपो मैदानावर खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात बेळगाव तालुका संघाने 14 षटकात 1 बाद 156 धावा केल्या. त्यात आकाश कुलकर्णीने 4 चौकारासह 68, सिद्देश असलकरने 5 चौकारासह 54 तर आशुतोषने 11 धावा केल्या. बेळगाव ग्रामीणतर्फे प्रसन्नाने 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना बेळगाव ग्रामीण संघाने 14 षटकात 8 बाद 77 धावाच केल्या. मदनने 16 धावा केल्या. बेळगाव तालुकातर्फे स्वरूप साळुंखे व वेदांत पाटील यांनी प्रत्येकी 2 तर सिद्देश असलकर व आकाश कुलकर्णी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
सामन्यानंतर जिल्हा शारीरिक शिक्षणाधिकारी डी. एस. डिग्रेज यांच्या हस्ते प्रमाणपत्र व चषक देवून गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून प्रमोद पालेकर, सी. आर. पाटील., जयसिंग धनाजी, उमेश मजुकर, विवेक पाटील, नागराज भगवंतण्णावर यांनी काम पाहिले.









