सुवर्णसौध की मच्छे याकडे लक्ष : नूतन वास्तूनंतरच गृहप्रवेश
बेळगाव : बेळगाव तालुका पंचायतीचे लवकरच स्थलांतर होणार आहे. सध्या असलेल्या जागेतून सुवर्णसौध अथवा मच्छे येथे या कार्यालयाचे स्थलांतर होणार आहे, अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता तालुक्याचा कारभार नेमका कोठे किंवा अशातच तालुका पंचायत व जिल्हा पंचायत निवडणुका लागल्या तर काय होणार? या विवंचनेत अनेक जण आहेत. नुकतीच पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी आढावा बैठकीत आपल्या ड्रीम प्रोजेक्ट म्हणजेच जिल्हाधिकारी कार्यालय आवारात भव्य अशी इमारत बांधण्याचे सांगितले आहे. यासाठी 150 कोटी ऊपये खर्च करण्यात येणार आहेत. त्यामुळे तालुका पंचायत कार्यालयही त्या ठिकाणी हलविण्यात येणार आहे. यासाठी आतापासून तालुका पंचायत कार्यालयात हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे याचे स्थलांतर सध्या सुवर्णसौध अथवा मच्छे येथे करण्यात येणार आहे.
या नव्या इमारतीबाबत पालकमंत्र्यांनी घोषणा केली असली तरी याच्या कामाला लवकरच चालना देण्यात येणार आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्यातील काही अभियंत्यांनी तालुका पंचायतमध्ये जाऊन कोणकोणते कक्ष, किंवा सभागृह, प्रशिक्षणासाठी सभागृह यासह सर्व माहिती घेण्यात आली आहे. तातडीने हे कार्यालय स्थलांतरित करून नूतन इमारतीचे काम करण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. त्यामुळे तालुका पंचायतमधील कामांची आता आवरावर करण्यासाठी धडपड सुरू झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, तालुका पंचायत कार्यालयात दररोज शेकडो नागरिक कामांसाठी येत असतात. मात्र सध्या नवीन इमारतीच्या कामाला सुऊवात झाल्यानंतर येथील कार्यालय इतरत्र हलविल्यानंतर नागरिकांना त्रास होणार असला तरी नवीन इमारतीमध्ये पुन्हा हे कार्यालय स्थापन करण्यात येणार आहे. मात्र सध्या हे कार्यालय लवकरच स्थलांतरित होणार यात शंका नाही. या कार्यालयाबरोबरच इतर कार्यालयेही या नूतन इमारतीमध्ये होणार आहेत. सध्या असलेल्या तालुका पंचायतमध्ये तालुका पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, दोन आमदार कक्ष, सभागृह, कार्यकारी अधिकाऱ्यांसाठी एक कक्ष, तालुका साहाय्यक अधिकाऱ्यांसाठी दोन कक्ष, अभियंत्यांसाठी एक कक्ष, इतर कामकाजासाठी दोन खोल्या यासह इतर आणखी काही खोल्या आहेत. या सर्वांची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याला देण्यात आली आहे. त्यामुळे आता लवकरच स्थलांतर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.









