वार्ताहर /सांबरा
बेळगाव-सुळेभावी बसने अचानक पेट घेतल्याने प्रवाशांची एकच धावपळ उडाली. वेळीच बसवाहक व चालकाने आग विझविल्याने पुढील अनर्थ टळला. ही घटना मंगळवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास गांधीनगर नजीकच्या रेल्वे ओव्हरब्रिजजवळ घडली. भरदुपारी दोन वाजता बेळगाव येथील बसस्थानकावरून केए 22 एफ 1745 या क्रमांकाची बस सुळेभावीकडे निघाली. बसमध्ये गर्दी होती. विशेषत: महिलांची संख्या जास्त होती. बस पुढे रेल्वे ओव्हरब्रिजचा रस्ता ओलांडून आली असता इंजिनमधून अचानक धूर येऊ लागला व लागलीच आगीनेही पेट घेतला. त्यामुळे बसचालकाने बस जागीच थांबविली. यावेळी सर्व प्रवासी खाली उतरले. बसपासून पुढे जाऊन काही अंतरावर थांबले. लागलीच बसचालक व वाहकाने आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. यावेळी घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.









