आकाश कुलकर्णी मालिकावीर : सिद्धेश असलकर सामनावीर
बेळगाव : आनंद अकादमी आयोजित 19 वर्षाखालील मुलांच्या आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लब संघाने बीडीके हुबळी संघाचा 6 गड्यांनी पराभव करुन आनंद चषक पटकाविला. सिद्धेश असलकरला सामनावीर तर आकाश कुलकर्णीला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला. भगवान महावीर मैदानावर खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात बीडीके संघाने प्रथम फलंदाजी करताना 20.2 षटकात सर्व गडी बाद 103 धावा केल्या. त्यात आकाश कुलकर्णीने 3 चौकारांसह 28, प्रभंजनने 1 षटकार, 1 चौकारासह 20 तर सार्थक गुंजाळने 15 धावा केल्या. बेळगाव स्पोर्ट्स क्लबतर्फे सिद्धेश असलकरने 15 धावात 2 तर हर्ष पटेलने 18 धावात 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना बेळगाव स्पोर्ट्स क्लबने 20.2 षटकात 4 बाद 104 धावा करुन सामना 6 गड्यांनी जिंकला त्यात अर्णव नुगानट्टीने 1 षटकार, 4 चौकारांसह 34 आशितोष हिरेमठने 32 तर आर्यन कुंदपने 16 धावा केल्या. बीडीके हुबळीतर्फे नुस्तसीमने 16 धावात 2 तर गणेश मादीनमनीने 1 गडी बाद केला. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे धनराज रतन, प्रणित रामगौडा, आर्यन उपाध्ये, दीपक पवार, संगम पाटील, कृष्णा नालकर, समीर केशकामत, आनंद भागवत, आनंद करडी आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या बेळगाव स्पोर्ट्स क्लबला व उपविजेत्या बीडीके संघाला चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीर सिद्धेश असलकर (बीएससी), उत्कृष्ट फलंदाज आर्यन कुंदप (बीएससी), उत्कृष्ट गोलंदाज मुस्तसीम (बीडीके), मालिकावीर आकाश कुलकर्णी (बीडीके) यांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.









