क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
आनंद क्रिकेट अकादमी आयोजित कर्डीस चषक 14 वर्षाखालील आंतर क्लब क्रिकेट स्पर्धेत शनिवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लबने एसकेईचा तर लायाज क्रिकेट अकादमीने दुर्गा स्पोर्ट्सचा पराभव करत प्रत्येकी दोन गुण मिळविले. लक्ष्य खतायत, सिद्धार्थ अधिकारी यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
भगवान महावीर मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात एसकेईने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 6 गडी बाद 140 धावा केल्या. त्यात निवृत्तीने 39, समर्थ कानकणीने 27 धावा केल्या. बीएससीतर्फे सिद्धार्थ रायकरने दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना बेळगाव स्पोर्ट्स क्लबने 17.5 षटकात 3 गडी बाद 142 धावा करून सामना सात गड्यांनी जिंकला. त्यात सचिन टी. ने 35, इम्तियाजने 30 तर लक्ष्य खतायतने 29 धावा केल्dया. एसकेईतर्फे नवनीत पावसकरने दोन गडी बाद केले.
दुसऱ्या सामन्यात दुर्गा स्पोर्ट्सने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 6 गडी बाद 128 धावा केल्या. त्यात प्रणव जे. ने 48, कार्तिक अक्षीमनीने 31 धावा केल्या. लायाजतर्फे सिद्धार्थने 3, आर्य शट्टीने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना लायाज अकादमीने 23.5 षटकात 3 गडी बाद 129 धावा करून सामना सात गड्यांनी जिंकला. त्यात स्वयम खोतने 44, वेदांतने 30 धावा केल्या. दुर्गातर्फे अभिषेक कट्टीने एक गडी बाद केला.









