बेळगाव : आनंद क्रिकेट अकादमी आयोजित सुरेश गडकरी चषक 13 वर्षांखालील आंतर कॅम्प क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून आनंद क्रिकेट अकादमीने एसकेईचा 9 गड्यांनी तर बेळगाव स्पोर्ट्स क्लबने एससीसीसीचा 8 गड्यांनी पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. सोहम केंचन्नावर व ओजस गडकरी यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आले. भुतरामहट्टी येथील भगवान महावीर मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात एसकेईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 गडी बाद 99 धावा केल्या. श्रेयस पी. ने 4 चौकारांसह 42, दक्ष शेरेगारने 20 धावा केल्या.
आनंदतर्फे वेदांत मादन्नावरने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना आनंद अकादमीने 15.5 षटकात 1 गडी बाद 101 धावा करून सामना 9 गड्यांनी जिंकला. त्यात श्लोक चडीचालने 7 चौकारांसह 37 तर ओजस गडकरीने 25 धावा केल्या. एसकेईतर्फे स्वप्नीलने 1 गडी बाद केला. दुसऱ्या सामन्यात एमसीसीसीने प्रथम फलंदाजी करताना 16.4 षटकात सर्व गडीबाद 51 धावा केल्या. त्यात आयुष हुगारने एकाकी लढत देत 15 धावांचे योगदान दिले. त्याव्यतीरिक्त एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. बेळगाव स्पोर्ट्स क्लबतर्फे सोहम पेंचन्नावरने 4 तर समर्थ चन्नीगेरी व समर्थ तलवार यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.









