रस्त्यावर सातत्याने वाहतुकीची कोंडी : अपघातात प्राणहानी, वाहनांच्या नुकसानीमुळे वाहनधारक त्रस्त : शासनाचे अनेक वर्षांपासून दुर्लक्षच
वार्ताहर /उचगाव
कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा या तीन राज्यांना जोडणाऱ्या बेळगाव-वेंगुर्ले मार्गावरील बेळगाव ते महाराष्ट्र हद्दीतील शिनोळी औद्योगिक वसाहतीपर्यंतच्या रस्त्याचे दुपदरीकरण करावे. वाहतुकीची होणारी कोंडी आणि सातत्याने होणाऱ्या अपघातातील प्राणहानी, वाहनांचे मोठे नुकसान थांबवावे, अशी मागणी प्रवासी व या भागातील असंख्य जनतेने बांधकाम खात्याकडे व शासनाकडे केली आहे. या रस्त्याच्या दुपदरीकरणाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबितच राहिली आहे. रोज हजारो वाहनांची या मार्गाने ये-जा होत असते. मात्र शासन याकडे कानाडोळा करत आहे. आतापर्यंत अनेकांना या रस्त्यावर प्राण गमवावे लागले आहेत. तसेच लहान-मोठ्या अपघातात अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. असे असतानाही शासन अजून किती जणांचे बळी गेल्यानंतर या रस्त्याकडे लक्ष देणार, असा संतप्त सवाल जनतेतून केला जात आहे.
रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणांचे जाळे
बेळगाव ते शिनोळी औद्योगिक वसाहतपर्यंतच्या 16 किलोमीटर अंतराच्या पट्ट्यात अनेकांनी रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण केल्याचे दिसून येते. विजयनगर, सिंधी कॉलनी, हिंडलगा, सुळगा, तुरमुरी, बाची व शिनोळी आदी गावे रस्त्याच्या दुतर्फा वसलेली आहेत. येथील अनेक व्यावसायिकांनी आपले लहान-मोठे व्यवसाय रस्त्यालगतच थाटले आहेत. यामध्ये प्रामुख्याने मटण, चिकन दुकाने, उपाहारगृह, किराणा दुकाने, चहाची टपरी, पानाची दुकाने, रसवंतीग्रह, फुले, नारळ, विक्रेते, भाजीविक्रेते, दुचाकी वाहन दुरुस्तीचे गॅरेज, असे अनेक व्यवसाय रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसून येतात. या दुकानांसमोर थांबणारी वाहने बऱ्याचवेळा रस्त्यावरच पार्क केल्याचे दिसून येते. त्यामुळे अशा ठिकाणी सतत गर्दी असते. मद्यविक्री करणाऱ्या दुकानांसमोर तर रांगांच्या रांगा लागलेल्या दिसतात. मात्र याचा सर्व त्रास रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहतुकदारांना होतो.
गणेश मंदिरांमधून भक्तांची गर्दी
या मार्गावरील पट्ट्यात दोन गणेश मंदिरे व एक हनुमान मंदिर आहे. अरगन तलावाजवळील गणेश मंदिर आणि उचगाव मार्कंडेय तीर्थक्षेत्रावरील गणेश मंदिर या दोन्ही मंदिरांजवळ मंगळवार व शुक्रवार तसेच संकष्टी, विनायक जयंती अशावेळी दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची गर्दी अधिक असते. अरगन तलावाजवळ वाहने पार्क करण्यासाठी पार्किंगची सोय केली आहे. उचगाव नदीजवळील गणेश मंदिराच्या दुतर्फा जागा नसल्याने आपली वाहने रस्त्याशेजारीच दुतर्फा पार्क करतात. यामुळे या ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी होते. रस्ता रुंदीकरण झाल्यास येथील समस्या मिटणार आहे.
बेळगाव-बाची रस्त्याचे दुपदरीकरण वगळले
यापूर्वी रायचूर ते बाचीपर्यंतच्या रस्त्याचे दुपदरीकरण होणार होते. शासनाकडून याला मंजुरी मिळाली होती. मात्र रायचूर-बेळगाव मार्गाचे केवळ दुपदरीकरण झाले. आणि बेळगाव-बाची रस्त्याचे दुपदरीकरण रखडले आहे. या रस्त्याच्या मंजुरीचा निधी कुठे गडप झाला हे मात्र गुलदस्त्यात राहिले. यानंतर या संदर्भात आवाज उठवताच रस्त्याच्या रुंदीकरणासाठी दोनवेळा मार्किंगचे नाटक केले. मात्र अद्याप रस्त्याचे रुंदीकरण काही झालेच नाही.
मंगलकार्यालयांमुळे कोंडी
या मार्गावर सिंधी कॉलनी, हिंडलगा, उचगाव, तुरमुरी या ठिकाणी मंगलकार्यालये आहेत. या ठिकाणीही लग्नसमारंभ व इतर कार्यक्रमप्रसंगी वाहतुकीची कोंडी होते. नवरदेवाची वरात काढली जाते. यावेळी वऱ्हाडी मंडळी रस्ता आपलाच समजून नाचत, गाजतवाजत चाललेले असतात. कार्यालयात सर्व मंडळी जाईपर्यंत ही गर्दी कायम असते. यावरही तोडगा काढण्यासाठी रस्ता रुंदीकरण करण्याची गरज आहे. परिणामी अशावेळी रुग्णवाहिका, गडबडीत असणाऱ्या मंडळींची मात्र मोठी कुचंबणा होताना दिसून येते.
बेळगाव-बाची रस्त्याची अक्षरश: चाळण
बेळगाव-बाची या पट्ट्यातील रस्त्याची सध्या चाळण झाली आहे. जुलै, ऑगस्टमध्ये झालेल्या पावसाने रस्त्यावर मोठमोठे ख•s पडून खडी, माती रस्त्यावर विखुरलेली होती. अनेकवेळा ओरड करून देखील सार्वजनिक बांधकाम खात्याचे याकडे दुर्लक्ष केले आहे. मात्र अलीकडे या रस्त्यावरील ख•s बुजविण्यात आले आहेत. मात्र हा संपूर्ण रस्ताच खराब झाल्याने रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या रस्त्याचे दुपदरीकरण करून या रस्त्याची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
गतिरोधकची नितांत गरज
बेळगाव-वेंगुर्ला मार्गाच्या दुतर्फा अनेक गावांचा समावेश आहे. दुतर्फा नागरिकांची वस्ती, गावे असल्याने थेट रस्त्यावरूनच लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण रस्ता पार करण्यासाठी धडपड करतात. आणि यामध्ये अनेकवेळा सातत्याने अपघात घडत आहेत. मात्र अनेक गावांशेजारी गतिरोधक नसल्याने शिवाय असलेली गतिरोधकांचे अस्तित्वच नष्ट होत असल्याने सर्वच वाहने भरधाव धावताना दिसत आहेत. या रस्त्यावरून जवळपास असलेल्या शाळाकडे ये-जा करणारी विद्यार्थी धावताना दिसतात वेगाला आवर नसल्याने अशा चिमुरड्या मुलांना अनेक ठिकाणी जीव गमावावे लागले आहेत. यासाठी जोडरस्ते या ठिकाणी गतिरोधक घालणे आवश्यक आहे.









