मिठाई वाटून केला आनंद व्यक्त
बेळगाव : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला मंगळवारी यश मिळाले. महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्याने आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. उपोषणाला मिळालेल्या यशाबद्दल बुधवारी बेळगाव सकल मराठा समाजातर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. धर्मवीर संभाजी चौकातील संभाजी महाराजांच्या मूर्तीसमोर मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे मागील पाच दिवसांपासून मुंबई येथे उपोषण सुरू होते. उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बेळगावमध्ये मूकमोर्चा काढला. तसेच सकल मराठा समाजाचे काही पदाधिकारी मुंबईला उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गेले होते. उपोषणाला यश मिळताच बुधवारी धर्मवीर संभाजी चौक येथे सकल मराठा समाजाचे समन्वयक प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर, रमाकांत कोंडुसकर, रणजित चव्हाण-पाटील, दलित समाजाचे नेते मल्लेश चौगुले, मोहन कांबळे यांच्या हस्ते धर्मवीर संभाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार घालण्यात आला.
मालोजी अष्टेकर म्हणाले, मनोज जरांगे पाटील मागील दोन वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देत आहेत. आजवरचा हा सर्वात मोठा लढा असून सीमावासियांनी या लढ्याला बळ देणे गरजेचे आहे. जरांगे पाटील यांनी सीमाप्रश्नासाठी आपण पुढे येणार असल्याचे यापूर्वीही स्पष्ट केले आहे. त्यामुळे मराठा समाजाने यापुढेही असेच एकत्रित रहावे, असे ते म्हणाले. मोहन कांबळे यांनीही मुंबई येथील उपोषणाबाबत माहिती देऊन मराठा समाजाला आरक्षणाची का गरज आहे? हे स्पष्ट केले. यावेळी नगरसेवक रवी साळुंखे, दत्ता उघाडे, जयराज हलगेकर, गणेश दड्डीकर, महेश जुवेकर, मोतेश बार्देशकर, शिवानी पाटील, कपिल भोसले, दत्ता जाधव, अंकुश केसरकर, सुनील जाधव, एम. वाय. घाडी व पदाधिकारी उपस्थित होते.









