महिला-बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची ग्वाही : 81 तलाव भरणीसाठी 800 कोटीचा निधी मंजूर, तलावांची स्वच्छता होणार
वार्ताहर /उचगाव
बेळगाव ग्रामीण मतदारसंघ विकासाच्या दृष्टीने फारच मागे राहिला आहे. या मतदारसंघातील अनेक विकासकामे राबवायची आहेत. आणि यासाठीच कर्नाटक शासनाकडे हट्टाने का होईना, आज 945 कोटीचा निधी मंजूर करून घेतला आहे. या निधीतून आता सर्व कामे राबवून ग्रामीणचा विकास बारामतीच्या धर्तीवर नक्की केल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही, तो करून दाखवणारच, असे उद्गार कर्नाटक राज्याच्या महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी काढले. बेळगाव ग्रामीण मतदार क्षेत्राच्यावतीने बेळगाव ग्रामीणमधील 81 तलाव भरणीसाठी 800 कोटीचा निधी मंजूर करून आणल्याबद्दल ग्रामीण मतदार संघाच्या क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी, ‘कृतज्ञता सोहळ्या’चे आयोजन केले होते. याप्रसंगी लक्ष्मी हेब्बाळकर बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुडाचे माजी अध्यक्ष युवराज कदम होते.
मंत्री हेब्बाळकर पुढे म्हणाल्या की, माझ्या बेळगाव ग्रामीण मतदार क्षेत्रातून मार्कंडेय व मलप्रभा अशा दोन नद्या वाहतात. या नद्यांचे पाणी जवळपासच्या तलावामधून सोडून तलाव भरणीसाठी 800 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून भूजल साठा वाढविण्यासाठी तलाव पाण्याने भरण्यात येणार आहेत. यामुळे परिसरातील शेतातील पिकांना या पाण्याचा चांगलाच उपयोग होणार आहे. याशिवाय तलावातून वर्षानुवर्षे साचलेला गाळ, झाडेझुडपे व इतर साचलेला कचरा काढून या तलावांची स्वच्छता करण्यात येणार आहे. त्याचबरोबर तलावाच्या काठावरून सुशोभीकरणाची कामे हाती घेण्यात येणार आहेत. तलाव स्वच्छता करून स्वच्छ पाणी पुरवठा केला जाणार आहे. याप्रमाणे कामे हाती घेतली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रारंभी एस. एम. बेळवटकर यांनी पूर्वीचा बेळगाव ग्रामीण मतदार क्षेत्र आणि आताचा ग्रामीण मतदारक्षेत्र याच्यामध्ये झालेला कायापालट, राबविण्यात आलेली विकासकामे, याबरोबरच मतदार क्षेत्रातील महिलांसाठी केलेल्या अनेक भरीव योजनांसंदर्भात माहिती दिली. यावेळी मल्लेश चौगुले, पुंडलिक भांदुर्गे, गुऊनाथ पाटील यांनीही यावेळी लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केलेल्या अनेक विकास कामांसंदर्भात आपले विचार मांडले.
अध्यक्षपदावरून बोलताना युवराज कदम म्हणाले, की ग्रामीण मतदार क्षेत्रात गोरगरीब जनता बरीच आहे. या क्षेत्रातील महिला आणि युवक यांना रोजगार मिळण्यासाठी रताळ्यावर प्रक्रिया करणाऱ्या एखाद्या कारखान्याची निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात यावे. तसेच उचगावला सुसज्ज असे हॉस्पिटल, कॉलेज, बेळगुंदी भागात कॉलेज, आणि तिलारी, जंगमहट्टी धरणातून पाणी मार्कंडेय नदीमध्ये सोडण्याची योजनाही कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर उचगाव ग्रा. पं. अध्यक्षा मथुरा तेरसे, बाळू देसुरकर, बेळगावकर, रघु खांडेकर, सिदाप्पा कांबळे, एस. एल. चौगुले यासह मतदार क्षेत्रातील अनेक नेतेमंडळी उपस्थित होती. यावेळी उचगाव, अतिवाड, राजहंसगड, मंडोळी, कावळेवाडी, कंग्राळी केएच, हंगरगा, मण्णूर, बेळवट्टी, बडस, तुरमुरी, येळेबैल, कुद्रेमनी, सुळगा हिं., आंबेवाडी, धामणे, बेनकनहळ्ळी, बाची, गोजगा, कंग्राळी बिके, संतीबस्तवाड, बिजगर्णी, किणये, सोनोली, ज्योतीनगर गणेशपूर, बेकिनकेरे, बाकनूर, याबरोबरच अनेक गावातील नागरिकांनी ग्रा. पं. व ग्रामस्थांतर्फे लक्ष्मी हेब्बाळकर यांचा शाल व पुष्पहार भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. राज्य युवा संघटनेचे अध्यक्ष मृणाल हेब्बाळकर यांनी आतापर्यंत केलेल्या अनेक विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी के. एन. एल.चे इंजिनियर बी. एस. केदार व व्ही. जी. पत्तार, निर्मिती केंद्राचे इंजिनियर नागराज पाटील यांचाही शाल, श्रीफळ देऊन लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन व आभार एन. ओ. चौगुले यांनी मानले. सोहळ्याला नागरिकांसह महिलांची मोठी उपस्थिती होती.









