पावणे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी/ बेळगाव
नव्या बांधकामावरून पत्रे व लोखंडी पाईप चोरल्याच्या आरोपावरून बेळगाव ग्रामीण पोलिसांनी दोघा जणांना अटक केली आहे. त्यांच्याजवळून 4 लाख 85 हजार 300 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
प्रवीण लक्ष्मण शिरुर (वय 23) राहणार सिद्धेश्वरनगर, कणबर्गी, किरण सिद्धाप्पा मिशी (वय 23) राहणार लक्ष्मी गल्ली, बसवनकोळ्ळ अशी त्यांची नावे आहेत. बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक नागनगौडा कट्टीमनीगौडर, उपनिरीक्षक संतोष दळवाई, उपनिरीक्षक लक्काप्पा जोडट्टी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. देसूरजवळील शेतवडीत ढाब्याचे बांधकाम सुरू आहे. बांधकामासाठी पत्रे व लोखंडी पाईप आणून ठेवण्यात आले होते. 71 हजार 300 रुपये किमतीचे 31 पत्रे व 14 हजार रुपये किमतीचे सात लोखंडी पाईप 3 ऑगस्टच्या रात्री 11 ते दुसऱ्या दिवशी 4 ऑगस्टच्या सकाळी 11 यावेळेत चोरण्यात आल्याचे उघडकीस आले होते.
यासंबंधी शिवाजीनगर, चव्हाट गल्ली, सुळगा येळ्ळूर येथील सुभाष कंग्राळकर यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून दोघा जणांना अटक केली असून पत्रे व लोखंडी पाईप वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले केए 22 एए 0419 क्रमांकाचे महिंद्रा पिकअप गुड्स वाहन व चोरीचा मुद्देमाल असा एकूण 4 लाख 85 हजार 300 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.









