तालुका म. ए. समितीच्या निवड कमिटीकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण
बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघासाठी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवार निवडीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. रविवारी मराठा मंदिर येथे इच्छुक उमेदवारांच्या 131 जणांच्या निवड कमिटीने मुलाखती घेतल्या. यामधून उमेदवाराचा सर्व बाजूंनी विचार केला जाणार असून बुधवार दि. 12 रोजी उमेदवार जाहीर केला जाणार आहे. तालुका म. ए. समितीने बेळगाव ग्रामीण मतदारसंघासाठी इच्छुकांना अर्ज करण्याचे आवाहन केले होते. यानुसार माजी महापौर शिवाजी सुंठकर, आर. एम. चौगुले, अॅड. सुधीर चव्हाण, रामचंद्र मोदगेकर, आर. आय. पाटील यांनी समितीकडे उमेदवारीसाठी अर्ज केला होता. लोकसभा पोटनिवडणुकीत ज्या प्रमाणात म. ए. समितीच्या उमेदवाराला मतदान झाले, त्याच प्रमाणात प्रत्येक गावाला प्रतिनिधित्व देत 131 जणांची निवड कमिटी स्थापन करण्यात आली. रविवारी मराठा मंदिर येथे निवड कमिटीची बैठक झाली. प्रारंभी सर्व इच्छुक उमेदवारांनी आपली ओळख करून दिली. दुपारच्या सत्रात प्रत्येक उमेदवाराला बोलावून 131 जणांच्या निवड कमिटीने मुलाखत घेतली. सीमाप्रश्नाविषयीचे योगदान, महाराष्ट्र-कर्नाटक सर्वोच्च न्यायालयातील खटला, समितीची पुढील दिशा, उमेदवारी न मिळाल्यास समितीशी प्रामाणिक राहणार का? असे विविध प्रश्न उमेदवारांना विचारण्यात आले. अॅड. राजाभाऊ पाटील, मनोज पावशे, मनोहर किणेकर, अॅड. एम. जी. पाटील, म्हात्रू झंगरुचे, आर. के. पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली. उमेदवारांची मुलाखत घेताना सर्व बाबींचा विचार करण्यात आला. बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील प्रत्येक गावचे प्रतिनिधी या बैठकीमध्ये सहभागी झाले होते. त्यापूर्वी सर्व इच्छुकांना आपापसात उमेदवार ठरविण्याची संधी देण्यात आली. परंतु, आपापसात एकमत न झाल्याने त्यांनी हा निर्णय निवड कमिटीकडे सोपविला.
12 एप्रिलला उमेदवारी होणार घोषित
तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने ठरविल्यानुसार बुधवार दि. 12 रोजी बेळगाव ग्रामीण मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर केला जाणार आहे. त्यापूर्वी सकाळी 10 वाजता मराठा मंदिर येथे निवड कमिटीची बैठक होणार आहे. यावेळी प्रत्येक गावातील जनमताचा कौल घेतला जाणार आहे. त्यानंतर निवड प्रक्रिया होऊन उमेदवाराची निवड होणार असल्याचे अॅड. एम. जी. पाटील यांनी सांगितले.









