अभिनेते सयाजी शिंदेंसह कलाकारांची उपस्थिती : चित्रपट 27 रोजी देशभरात प्रदर्शित
बेळगाव : ‘ऑल ईज वेल’ या चित्रपटाच्या कलाकारांचे मंगळवारी बेळगावमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मराठीतील अनेक दिग्गज कलाकार बेळगावमध्ये आले होते. महाविद्यालयांमध्ये तरुण तसेच नागरिकांशी संवाद साधत येत्या शुक्रवारी चित्रपटगृहात जाऊन ‘ऑल ईज वेल’ चित्रपट पहा, असे आवाहन त्यांनी प्रेक्षकांना केले. चित्रपटाचा प्रमोशन सोहळा मराठा मंदिर येथे पार पडला. प्रारंभी चित्रपटाचा प्रोमो तसेच गाणी दाखविण्यात आली. अभिनेता सयाजी शिंदे, अभिनय बेर्डे, दिग्दर्शक योगेश जाधव, लेखक प्रियदर्शन जाधव, अभिनेता रोहित हळदीकर, नक्षत्रा मेढेकर, सायली पाठक यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला. एखादा चित्रपट बेळगावमध्ये हिट झाला तर तो संपूर्ण देशात गाजतो, हे यापूर्वी दिसून आले आहे. त्यामुळे बेळगावच्या प्रेक्षकांनी भरभरून प्रेम द्यावे. बेळगावचेच असलेले निर्माता अमोद मुचंडीकर, वाणी हालपण्णावर, सहनिर्माता मल्लेश मरूचे, विनायक पट्टणशेट्टी यांनी दाखविलेल्या धाडसामुळे एक सुंदर चित्रपट तयार झाल्याचे अभिनेते सयाजी शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
महाविद्यालयीन तरुणांकडून जोरदार स्वागत
चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बेळगावमध्ये आलेल्या ‘ऑल ईज वेल’च्या कलाकारांनी शहरातील काही महाविद्यालयांमध्ये जाऊन चित्रपटाचे प्रमोशन केले. मराठा मंडळ कॉलेज तसेच भाऊराव काकतकर महाविद्यालयात तरुणांनी या कलाकारांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी अभिनेते सयाजी शिंदे यांच्यासोबत आपली छबी टिपण्यासाठी तऊणांची धडपड दिसून आली. बऱ्याच दिवसांनी एका मराठी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कलाकार बेळगावमध्ये आल्यामुळे दिवसभर या चित्रपटाची चर्चा शहरात सुरू होती.
सक्ती करून कोणतीही भाषा शिकता येत नाही : सयाजी शिंदे
भाषेच्या सक्तीचा मुद्दा सध्या सर्वत्र गाजत आहे. परंतु सक्ती करून कोणतीच भाषा शिकता येत नाही. आपण आईकडून शिकलेली भाषाच खरी भाषा असते. सरकारे येतील आणि जातील, परंतु भाषेची सक्ती केल्यामुळे आपली मातृभाषा बदलणार नाही. इतर भाषांबद्दल आदर आहे, परंतु मराठी मातृभाषेबद्दल अधिक आदर आहे, असे मत अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रात सुरू असलेल्या हिंदी भाषेच्या सक्तीवरून ते बोलत होते.









