शिवमोगा आघाडीवर : रामनगर दुसऱ्यास्थानी : 140 तलावांचे काम पूर्ण
बेळगाव : ग्रामीण भागातील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या सहयोगातून राज्यात अमृतसरोवर योजना राबविण्यात आली आहे. या योजनेनुसार राज्यामध्ये अमृतसरोवर योजना राबविण्यात बेळगाव जिल्हा पाचव्या क्रमांकावर आहे. शिवमोगा पहिल्या क्रमांकावर असून, रामनगर दुसऱ्या, हासन तिसऱ्या, कोलार चौथ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यामध्ये 284 अमृतसरोवर निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून 140 तलावांचे काम पूर्ण झाले आहे. पाण्याचे संवर्धन व्हावे, गावागावात असणाऱ्या तलावांचे नूतनीकरण व्हावे, ग्रामीण भागातील जनतेला रोजगार मिळावा, पर्यावरणाचे संरक्षण होण्यास मदत क्हावी, भूजल पातळी वाढावी या उद्देशाने केंद्र सरकारकडून अमृतसरोवर योजना राबविण्यात येत आहे. राज्य व केंद्र सरकारच्या सहयोगातून रोजगार हमी योजनेंतर्गत ही योजना राबविली जात आहे. राज्यामध्ये ग्राम पंचायतींच्या व्याप्तीत 6776 तलाव निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. योजना अंमलात आणल्यानंतर आतापर्यंत 3552 तलाव पूर्ण झाले आहेत. तर 5284 तलाव प्रगतिपथावर आहेत.
अमृतसरोवर निर्माण करण्यात शिवमोगा जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. 205 तलावांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून 192 तलाव पूर्ण झाले आहेत. रामनगर 296 तलावांचे उद्दिष्ट तर 190 तलाव पूर्ण करून दुसऱ्या क्रमांकावर आहे. हासन 360 तलावांचे उद्दिष्ट तर 186 तलाव पूर्ण, कोलार 292 तलावांचे उद्दिष्ट 184 तलाव पूर्ण, बेळगाव जिल्ह्यामध्ये 284 तलावांचे उद्दिष्ट आहे. त्यातील 267 तलावांचे काम हाती घेतले असून 140 तलावांचे काम पूर्णत्वाला गेले आहे. सर्वाधिक तलाव राबविण्याचे उद्दिष्ट तुमकूर जिल्ह्याला असून 452 तलाव निर्माण करण्यात येणार आहेत. यापैकी 124 तलाव पूर्ण आहेत. यानंतर सर्वात कमी दक्षिण कन्नड (मंगळूर) जिल्ह्याला 84 तलावांचे उद्दिष्ट दिले असून त्यापैकी 74 तलाव पूर्ण झाले आहेत.









