सुवर्णकाराच्या चौकशीमुळे पोलीस ठाण्यात तणाव : अट्टल गुन्हेगार प्रकाश पाटील याच्या जबाबानंतर कार्यवाही
वार्ताहर / कणकवली
वागदे येथून अटक केलेला आंतरराज्य गुन्हेगार, घरफोड्या करणारा चोरटा प्रकाश विनायक पाटील (38, गोवा) हा कणकवली पोलिसांच्या कोठडीतून पुढे लांजा पोलिसांच्या कोठडीत गेला. त्यानंतर बेळगाव पोलिसांनी तेथील गुन्ह्यात त्याचा ताबा घेतला. मात्र, 27 जुलैला या घटनेमध्ये एक नवे ‘ट्विस्ट’ घडले. पाटील याने बेळगाव येथे केलेल्या घरफोडीतून मिळालेले काही सोने कणकवलीतील एका सुवर्णकाराला विकले, अशी बाब बेळगाव येथील एपीएमसी पोलीस ठाण्याच्या तपासात पुढे आली. याच कारणासाठी गेल्या दोन दिवसांपासून सिंधुदुर्गात असलेल्या बेळगाव पोलिसांनी कणकवली शहरातील एक सुवर्णकार व आटणीवाला अशा दोघांना चौकशीसाठी कणकवली पोलीस ठाण्यात आणले. सुवर्णकाराला बेळगाव पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्यामुळे कणकवली शहरातील सुवर्णकार, राजकीय व विशेषत: भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कणकवली पोलीस ठाण्यात धाव घेतली. बेळगाव पोलिसांची मुजोरी सुरू असल्याचा आरोप सुवर्णकार व राजकीय मंडळींनी केला. त्यामुळे वातावरण काहीसे तणावपूर्ण झाले होते.
दरम्यान, ताब्यात घेतलेला सुवर्णकार, आटणीवाला अशा दोघांची बेळगाव पोलिसांनी कणकवली पोलीस ठाणे येथे कणकवली पोलिसांसमक्ष चौकशी केली. यावेळी चोरटा प्रकाश पाटील यालाही तेथे आणण्यात आले होते. चौकशीअंती सुवर्णकार, आटणीवाला अशा दोघांनाही नोटीस देण्यात आली असून तपासाच्या अनुषंगाने बेळगाव पोलीस ठाणे येथे हजर राहवे, असे नोटिसीत म्हटले आहे, अशी माहिती बेळगावचे पोलीस उपनिरीक्षक किरण होनकट्टी यांनी दिली. दरम्यान कणकवली शहरातील दोन व्यावसायिकांची चौकशी झाल्यानंतर सुवर्णकार व भाजपच्या मंडळींनी धाव घेतल्यामुळे कणकवली पोलीस ठाणे परिसरातील वातावरण काहीसे तणावपूर्ण बनले होते.
चोरट्याने कणकवलीत सोने विकले
दरम्यान, चोरटा पाटील कणकवली पोलिसांच्या कोठडीतून लांजा पोलिसांच्या कोठडीत गेला. बेळगाव पोलिसांनी न्यायालयामार्फत चोरट्याचा ताबा घेतला. बेळगाव पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा गाठला. त्यानंतर त्याची कसून चौकशी झाली. यात चोरट्याने बेळगाव येथून चोरलेले काही सोने कणकवलीतील एका आटणीवाल्याकडे विकले व आटणीवाल्याने ते सोने एका सुवर्णकाराला दिले, अशी माहिती बेळगाव पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार बेळगाव पोलीस गुरुवारी सकाळी कणकवलीत दाखल झाले. पोलिसांनी सुवर्णकारासह आटणीवाल्याला चौकशीसाठी कणकवली पोलीस ठाण्यात आणले.
सुवर्णकार, राजकीय मंडळींची धाव
घटनेची माहिती समजताच कणकवली शहरातील सुवर्णकार व्यावसायिक तसेच भाजपच्या काही मंडळींनी कणकवली पोलीस ठाण्यात धाव घेतली. यामध्ये जि. प. माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी नगरसेवक संजय कामतेकर, माजी उपसभापती मिलिंद मेस्त्राr, कलमठ सरपंच संदीप मेस्त्राr, उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, वागदे सरपंच संदीप सावंत, भाजप युवा मोर्चा पदाधिकारी पप्पू पुजारे, सुवर्णकार दीपक बेलवलकर, मंगेश तळगावकर, श्रीs. पेडणेकर आदींचा समावेश होता.
बेळगाव पोलिसांकडून दोघांनाही नोटीस
दरम्यान, बेळगाव पोलिसांनी कणकवली पोलीस निरीक्षक यांच्या केबिनमध्ये सुवर्णकार व आटणीवाला यांची चोरटा पाटील याच्यासमक्ष चौकशी केली. यावेळी कणकवली पोलीस ठाण्याचा तात्पुरता पदभार असणारे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, उपनिरीक्षक शरद देठे उपस्थित होते. पण, चौकशीसत्राची अधिक माहिती देण्यास बेळगाव पोलिसांनी नकार दिला. मात्र, दोघांनाही तपासाच्या अनुषंगाने नोटीस देण्यात आली असून त्याद्वारे त्यांना बेळगाव पोलीस ठाणे येथे हजर राहण्यास सांगितले असल्याची माहिती त्यांनी दिली.









