बेळगाव : जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव प्राईड सहेली व नेक्स्ट लेव्हल फिटनेस यांच्या संयुक्त विद्यमाने चक दे चषक महिलांच्या खुल्या क्रिकेट स्पर्धेत बेळगावच्या पँथर संघाने ओपीएल डायनामिक संघाचा पराभव करुन विजेतेपद पटकाविले. किक्क फ्लेक्स क्रिकेट टर्फ मैदानावरती आयोजित केलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन मंगेश पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत, ट्विंकल, सचिन हंगीरगेकर, हिरालाल अंबिका व क्रिकेटपटू श्रेया पोटे आदी उपस्थित होत्या. या स्पर्धेत एकूण 8 महिला संघांनी भाग घेतला होता. अंतिम सामना बेळगाव पँथर व ओपीएल डायनामिक यांच्यात झाला. त्यामध्ये बेळगाव पँथरने विजेतेपद पटकाविले.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे अभय जोशी, प्रमोद गुगाटी, दरगशेट्टी, आरती शहा, मोलाली शहा, अस्मिता जोशी, संतोष चव्हाण, संघटनेच्या अध्यक्षा जिग्ना शहा, रश्मी कदम आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या बेळगाव पँथर संघाला चषक व 10 हजार रुपये रोख व उपविजेत्या ओपीएल डायनामिक संघाला 7 हजार रुपये रोख व चषक देवून गौरविण्यात आले. या स्पर्धेत जे.पी.वॉरियर्स, ओपीएल डायनामिक, बेळगाव पँथर, केएलई टायटन्स, बेळगाव डॅशर्स, स्कॉडइंडिया, पॉवर रेंजर्स आदी संघांचा समावेश होता. स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज व मालिकावीर सीमा हुबळी, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सुनीता खोडा यांना चषक व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जायंट्स प्राईडच्या सहेली व नेक्स्ट लेव्हल फिटनेसच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.









