नैर्त्रुत्य रेल्वेचा निर्णय : दोन रेल्वेंचा समावेश, आषाढी एकादशीला वारकऱयांची होणार सोय
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव तसेच हुबळी परिसरातील वारकऱयांसाठी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी दोन विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय नैर्त्रुत्य रेल्वेने घेतला आहे. पूर्णपणे अनारक्षित असणाऱया बेळगाव-पंढरपूर व हुबळी ते पंढरपूर या मार्गावर या रेल्वे धावणार आहेत. यामुळे रविवारी होणाऱया आषाढी एकादशीला वारकऱयांना पंढरपुरात जाणे व तेथून पुन्हा गावी येणे सोयीचे होणार आहे.
बेळगाव परिसरात हजारो वारकरी आहेत. येथून आषाढी एकादशीला हजारो भाविक पंढरपूर येथे जातात. मागील दोन वर्षांचा कोरोनाकाळ वगळता दरवषी नैर्त्रुत्य रेल्वेकडून विशेष रेल्वे सोडली जाते. यावषीही आषाढीनिमित्त विशेष रेल्वे सुरू करावी, अशी मागणी वारकऱयांमधून होत होती. सीटीझन कौन्सिलच्या सदस्यांनी नैर्त्रुत्य रेल्वेकडे विशेष रेल्वेची मागणी केली होती. तसेच राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी व खासदार मंगला अंगडी यांनीही पत्र पाठवून नैर्त्रुत्य रेल्वेला विशेष रेल्वे सोडण्याची मागणी केली होती.
पंढरपूर-बेळगाव-पंढरपूर रेल्वे
बेळगाव-पंढरपूर (रेल्वे क्रमांक 07387) ही रेल्वे रविवार दि. 10 रोजी पहाटे 5.30 वा. बेळगावमधून निघणार आहे. सकाळी 11.45 वा. पंढरपूर येथे पोहोचेल. पंढरपूर-बेळगाव (रेल्वे क्र. 07388) ही रेल्वे शनिवार दि. 9 रोजी रात्री 7.30 वा. पंढरपूर येथून निघून पहाटे 3 वा. बेळगाव येथे पोहोचणार आहे. या रेल्वेला सुळेभावी, सुलधाळ, पाच्छापूर, गोकाक, घटप्रभा, चिकोडी रोड, रायबाग, चिंचली, कुडची, उगार, शेडबाळ, विजयापूर, मिरज, अरग, कवठेमहाकाळ, सांगोला या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
हुबळी-पंढरपूर-हुबळी
हुबळी-पंढरपूर (रेल्वे क्र. 07385) ही रेल्वे शनिवार दि. 9 रोजी सकाळी 7 वा. हुबळी येथून निघणार आहे. सकाळी 9.45 वा. बेळगाव तर दुपारी 4.30 वा. पंढरपूरला पोहोचणार आहे. पंढरपूर-हुबळी (रेल्वे क्र. 07386) ही रेल्वे रविवारी रात्री 7.30 वा. पंढरपूर येथून निघणार असून मध्यरात्री 2.30 वा. बेळगाव तर सोमवारी पहाटे 6.55 वा. हुबळीला पोहोचणार आहे.
दोन विशेष अनारक्षित रेल्वेंची सुविधा
हुबळी, बेळगाव या भागातून पंढरपूर येथील यात्रेसाठी विशेष रेल्वे सोडण्याची मागणी लोकप्रतिनिधींसोबत नागरिकांमधून करण्यात आली होती. याची दखल घेत वारकऱयांना पंढरपुरात पोहोचता यावे, यासाठी दोन विशेष अनारक्षित रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत. विठ्ठल भक्तांनी या रेल्वेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
– अनिश हेगडे (जनसंपर्क अधिकारी-नैर्त्रुत्य रेल्वे)









