तालुक्यात आगीच्या वाढत्या घटना : वेळेत पोहोचणे होते अशक्य : उत्तर भागात केंद्राचा प्रस्ताव धूळखात
बेळगाव : बेळगाव जिल्ह्याचे मुख्यालय असणाऱ्या बेळगाव तालुक्यात केवळ एकच अग्निशमन केंद्र आहे. औद्योगिक वसाहत व आगीच्या घटना पाहता शहराच्या उत्तर भागात अग्निशमन केंद्र सुरू करणे हा प्रस्ताव अद्यापही धूळ खात पडला आहे. तालुक्याच्या प्रत्येक गावापर्यंत वेळेत पोहोचणे शक्य होत नसल्यामुळे आगीमुळे नुकसान मोठ्या प्रमाणात होत असून, उत्तर भागात महानगरपालिकेने जागा उपलब्ध करून अग्निशमन केंद्र सुरू करणे गरजेचे आहे. 1987 मध्ये गोवावेस येथे अग्निशमन केंद्र सुरू करण्यात आले. बेळगावची वाढलेली औद्योगिक वसाहत व लोकसंख्या या मानाने 36 वर्षात आणखी एक अग्निशमन केंद्र सुरू होणे गरजेचे होते. सीमेवरील 25 ते 30 कि. मी.वरील गावांमध्ये आग लागल्यास ती विझविण्यासाठी जाणाऱ्या अग्निशमन बंबाला तासभर कालावधी लागत असून, या दरम्यान आगीमुळे मोठे नुकसान होते. उद्यमबागप्रमाणेच काकती, होनगा, कंग्राळी, ऑटोनगर परिसरात औद्योगिक वसाहत पसरली आहे. सर्व सरकारी कार्यालये व सिव्हिल हॉस्पिटल उत्तर भागात असल्याने जवळपास अग्निशमन केंद्र सुरू करणे गरजेचे आहे. गोवावेसपासून शहराच्या उत्तर भागात तसेच तालुक्याच्या शेवटच्या गावापर्यंत पोहोचणे शक्य होत नाही. त्यामुळे शहराच्या उत्तर भागात अग्निशमन केंद्र सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. सुवर्णसौध येथेही अग्निशमन केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव होता. परंतु अद्याप तो प्रस्ताव कागदावरच आहे.
पाच वर्षात 146 जणांना वाचविले
अग्निशमन केंद्रात सध्या 50 कर्मचारी असून आग लागल्याची माहिती समजताच ती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. आगीमधून मनुष्यासह प्राण्यांचाही बचाव केला जातो. मागील 5 वर्षात 146 हून अधिक लोकांचे जीव वाचविण्यात आले आहेत. बेळगाव जिल्ह्यात आलेल्या महापुराच्या वेळी अग्निशमन विभागाने मोठे कार्य केले होते. त्यामुळे बेळगावमध्ये आणखी एका अग्निशमन केंद्राची आवश्यकता भासत आहे.
जवानांचे प्रयत्न सार्थकी
बेळगाव अग्निशमन केंद्रामध्ये 2018 ते जानेवारी 2023 या काळात 1026 फोन आले होते. या दरम्यान लागलेल्या आगीमध्ये 5.15 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. अग्निशमन जवानांच्या प्रयत्नांमुळे 13.20 कोटी रुपयांची मालमत्ता वाचविण्यात यश आले.
उत्तर भागात आवश्यकता
शहरासह तालुक्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला असून आगीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. आगीची घटना घडल्यानंतर वेळेत पोहोचणे सर्वात महत्त्वाचे असते. परंतु वाहतूक कोंडी, घटना घडलेले अंतर यामुळे अधिक नुकसान होत असून, शहराच्या उत्तर भागात अग्निशमन केंद्र सुरू केल्यास सर्वांनाच सोयीचे ठरणार आहे.
व्ही. एस. टक्केकर, अग्निशमन अधिकारी.
जिल्ह्यातील अग्निशमन केंद्रांची संख्या
- बेळगाव 1
- चिकोडी 2
- हुक्केरी 3
- अथणी, निपाणी, खानापूर, कित्तूर, गोकाक, रायबाग, सौंदत्ती, बैलहोंगल, रामदुर्ग येथे प्रत्येकी 1









