अर्थ स्थायी समिती अध्यक्षा नेत्रावती भागवत यांच्याकडून सादर
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव महानगरपालिकेच्यावतीने 2025-26 च्या आर्थिक वर्षासाठी 10 लाख 35 हजार रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थ स्थायी समितीच्या अध्यक्ष नेत्रावती भागवत यांनी शनिवार दि. 1 रोजी अर्थसंकल्पीय बैठकीत हा अर्थसंकल्प सादर केला. त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. 2025-26 च्या आर्थिक वर्षासाठी महापालिकेला एकूण 141 कोटी 99 लाख 43 हजार रुपये उत्पन्न मिळणार असून 141 कोटी 89 हजार 8 हजार खर्च अंदाजित आहे. अशाप्रकारे चालू वर्षात 10 लाख 35 हजार
रुपये शिलकी अर्थसंकल्प मांडला.
शनिवार दि. 1 रोजी महापालिका सभागृहात 2025-26 सालासाठीच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यासाठी अर्थसंकल्पीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी काळजीवाहू महापौर सविता कांबळे होत्या. व्यासपीठावर उपमहापौर आनंद चव्हाण व मनपा आयुक्त शुभा बी. होत्या. अर्थसंकल्पीय बैठकीस सुरुवात होताच महापौर सविता कांबळे यांनी 2025-26 सालासाठी अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे सभागृहाला सांगितले. त्यानंतर अर्थ स्थायी समितीच्या अध्यक्षा नेत्रावती भागवत यांनी महापौरांच्या परवानगीवरून अर्थसंकल्प सादर केला.
अंदाजित उत्पन्न
महापालिकेच्या हद्दीतील मालमत्तांकडून अंदाजे 7808.33 लाख महसूल जमा होण्याचा अंदाज आहे. हा कर वसूल करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे. मालमत्तांची माहिती सॉफ्टवेअरमध्ये नोंदवून जनतेला मूलभूत सुविधा पुरविल्या जाणार आहेत.
► इमारत परवाना विकास शुल्क, सुधारित शुल्कातून 1003.00 लाख उत्पन्न अपेक्षीत आहे. स्क्रॅपमधून 185.00 लाख रुपये अपेक्षीत आहे.
►महापालिकेच्या खुल्या जागांच्या विक्रीतून 1050.00 लाख रुपये उत्पन्न अपेक्षीत आहे.
►एसएफसी आणि निधी अनुदानाखाली 710.00 लाख रुपये अपेक्षीत आहे. या रकमेपैकी 29 टक्के राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार आऊटसोर्सिंग सफाई कामगारांचे वेतन आणि आपत्कालिन भत्यासाठी वापरण्यात येईल.
►एसएफसी वीज अनुदान 5200.00 लाख रुपये अपेक्षीत आहे. उर्वरित रक्कम थेट वीज विभागाला भरण्यात येईल.
►16 व्या वित्त आयोगाचे अनुदान 2000.00 लाख रुपये अपेक्षीत आहे.
►हेस्कॉमकडून केबल वीजवाहिन्या घालण्यासाठी 1700.00 लाख रुपये उत्पन्न निश्चित करण्यात आले आहे.
►महापालिकेच्या हद्दीत रस्ते, खोदकामातून 275.00 लाख रुपये उत्पन्न अपेक्षीत आहे. घनकचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून 975.00 लाख रुपये उत्पन्न अपेक्षीत आहे.
►स्थावर मालमत्तांच्या नोंदणीतून 110.00 लाख रुपये नोंदणी विभागाकडून अपेक्षीत आहे.
►मालमत्ता हस्तांतर शुल्क दंडातून अंदाजे 80.00 लाख रुपये अपेक्षीत आहेत.
►अशाप्रकारे एकूण 441 कोटी 99 लाख 40 हजार रुपये उत्पन्न अपेक्षीत आहे.
अंदाजित खर्च
►महापालिकेच्या सफाई कामगारांना आपत्कालिन भत्ता 2000 रुपये दरमहा एकूण 250.00 लाख रुपये आणि अल्पोपहार भत्ता 35 रुपये दररोज एकूण 150.00 लाख रुपये महापालिका स्वत:च्या निधीतून भरणार आहे.
►बेळगावला स्वच्छ शहर बनविण्यासाठी आऊटसोर्सिंग सफाई खर्चासाठी 2932.00 लाख रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत.
►थेट नियुक्ती झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 1000.00 लाख रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत.
►वैज्ञानिक घनकचरा विल्हेवाटीसाठी 400.00 लाख रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत.
►रस्ते, गटारी, पादचारी, पावसाचे पाणी व्यवस्थापन, विहीर खोदाई करण्यासाठी 925.00 लाख रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत.
►महापालिकेच्या हद्दीतील मोकाट कुत्र्यांच्या व्यवस्थापनासाठी 75.00 लाख रुपये.
►महापालिकेच्या उत्पन्नातून सर्व जमा आणि खर्चाव्यतिरिक्त शिल्लक असलेल्या शेकडा 1 टक्के रकमेतून 3.75 लाख रुपये खेळासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
►पत्रकार कल्याण निधीसाठी 50 लाख रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत.
►महापालिकेच्या हद्दीतील स्मशानभूमी अंत्यविधी आणि विकासासाठी 75 लाख रुपये.
►महापालिकेच्या हद्दीत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, विहिरींचा विकास करण्यासाठी 157 लाख रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत.
भांडवली खर्च
शहरातील 58 प्रभागांमध्ये नवीन रस्त्यांसाठी 500.00 लाख रुपये, काँक्रिट रस्त्यासाठी 100.00 लाख रुपये, गटारीसाठी 400.00 लाख रुपये, महापालिकेच्या खुल्या जागांच्या संरक्षणासाठी 100.00 लाख रुपये आणि शहराच्या प्रवेशद्वारांच्या सौंदर्यीकरणासाठी 50.00 लाख रुपये अशाप्रकारे एकूण 2700.00 लाख रुपये मूलभूत सुविधांसाठी आणि शहरातील 58 प्रभागांमध्ये विविध मुलभूत सुविधांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
►100.00 लाख रुपयांमधून नवीन संगणकीकरणासाठी यंत्रसामुग्री खरेदीसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत आणि महापलिकेत ई-ऑफिस बांधकामासाठी 25.00 लाख रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत.
►महापालिकेच्या हद्दीतील उद्यानांच्या विकासासाठी 320.00 लाख रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत.
►कुत्र्यांच्या आश्रयासाठी 20.00 लाख रुपये राखीव ठेवले आहेत.
►दोन नवीन शववाहिन्या खरेदी करण्यासाठी 40 लाख रुपये.
►गटारी व गटारींच्या दुरुस्तीसाठी, समुदाय भवन, सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधकासाठी 600.00 लाख रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत.
►याशिवाय केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणाऱ्या 15 व्या वित्त आयोग योजना, महात्मा गांधी शहर विकास योजना, स्वच्छ भारत मिशन, अमृत योजना, पावसाचे पाणी अडवा योजना, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, स्वच्छ भारत अभियान, एसएफसी विशेष अनुदान, गृहभाग्य योजना, इत्यादीमधून मिळणाऱ्या अनुदानाच्या आधारावर आणि मार्गदर्शक तत्त्वांचा विचार करून कृती योजना तयार करून सक्षम प्राधिकरणाकडून मंजुरी घेऊन प्राधान्याने निधी वापरण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले.









