विविध मागण्यांसाठी आंदोलन : आज राहणार मनपाचे कामकाज ठप्प
बेळगाव : विविध मागण्यांसाठी बेळगावसह राज्यातील दहा महानगरपालिकेचे कामकाज उद्या मंगळवार दि. 8 रोजी ठप्प राहणार आहे. सर्व अधिकारी व कर्मचारी सामूहिक रजेवर जाणार आहेत. बेंगळूर येथील फ्रिडम पार्कवर होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी बेळगाव महानगरपालिका कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी सोमवारी बेळगावातून रवाना झाले. सातवा वेतन आयोग, बेंगळूर महानगरपालिकेत रिक्त असलेल्या जागा भरून घेणे, ई-आस्थी, त्याचबरोबर 12 हून अधिक प्रमुख मागण्यांची पूर्तता करण्यात यावी. या मागणीसाठी राज्यातील दहा महानगरपालिकांचे कामकाज मंगळवारी एक दिवस ठप्प असणार आहे. सरकारने मागण्यांची दखल घ्यावी, यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी सामूहिक रजेवर जाणार आहेत.
यापूर्वीच बेळगाव महानगरपालिका कर्मचारी संघटनेतर्फे महापौर मंगेश पवार यांना लेखी कळविले आहे. सर्व अधिकारी व कर्मचारी सामूहिक रजेवर जात असल्याने महापालिकेचे कामकाज मंगळवार ठप्प असणार आहे. त्यामुळे महापालिकेसंबंधीत काही काम असल्यास नागरिकांना बुधवारीच ते करून घ्यावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी महानगरपालिकेत नागरिकांची गर्दी पहावयास मिळाली. मंगळवारी बेंगळूर येथील फ्रीडम पार्कवर होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी बेळगावातून मनपा कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी रवाना झाले. त्यांना महापौर मंगेश पवार यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी मनपा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मलिक गुंडप्पन्नावर, यल्लेश बच्चलपुरी, महसूल अधिकारी भरत कोलकार यांच्यासह इतर पदाधिकारी रवाना झाले.









