स्वच्छता, ड्रेनेज, गटारींची समस्या कारणीभूत : राज्यपातळीवर 7 व्या स्थानावरून 11 व्या स्थानी घसरण
बेळगाव : केंद्र सरकारकडून 2024-25 सालासाठी केलेल्या स्वच्छ सर्वेक्षणात बेळगाव महानगरपालिकेला राष्ट्रीय पातळीवर 72 व्या तर राज्यपातळीवर 11 व्या स्थानी समाधान मानावे लागले. कारण बेळगाव शहरातील कचरा उचल, स्वच्छता, सार्वजनिक शौचालयांची देखभाल, घरोघरी जाऊन कचऱ्याची होणारी उचल, कचऱ्याचे वर्गीकरण अद्याप म्हणावे तसे होत नसल्याने अनेक वर्षांपासून महापालिकेला अपेक्षित लक्ष्य गाठण्यात अपयश येत आहे. सध्या शहरातील परिस्थिती पाहता जिकडेतिकडे कचरा समस्या गंभीर बनली आहे.
शहराच्या स्वच्छतेसाठी घंटागाडीद्वारे घरोघरी होणारे कचऱ्याचे संकलन, ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण अशाप्रकारचे उपक्रम राबविण्यात येत असले तरी स्वच्छता सर्वेक्षणाच्या निकषांमध्ये कोणतीही प्रगती झालेली नाही. स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार चार श्रेणींमध्ये शहरांना दिला जातो. लहान शहरे (20 हजार लोकसंख्या), लहान शहरे (20 ते 50 हजार लोकसंख्या), मध्यम शहरे (50 ते 3 लाख लोकसंख्या) आणि मोठी शहरे (3 ते 10 लाख लोकसंख्या) यापैकी बेळगाव महापालिका गेल्यावर्षी मोठ्या शहरांच्या श्रेणीत कर्नाटकात 7 व्या क्रमांकावर होती. यावर्षी ती आणखी घसरली असून, 11 व्या क्रमांकावर पोहोचण्यासाठीदेखील संघर्ष करावा लागत आहे. गेल्यावर्षी राष्ट्रीय पातळीवर 118 व्या क्रमांकावर असलेल्या महापालिकेने यावेळी 72 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. ही वस्तूस्थिती थोडी दिलासादायक आहे.
सर्वेक्षणात बेळगाव मनपाला 10 हजारपैकी 6,303 गुण
सर्वेक्षणात बेळगाव महापालिकेने 10 हजारपैकी 6,303 गुण मिळविले आहेत. प्रमाणपत्रात 2,500 पैकी 750 गुण मिळाले आहेत. राज्यस्तरीय सर्वेक्षणात 7053 गुण मिळाले आहेत. मागील सर्वेक्षणाच्या तुलनेत घरोघरी कचरा संकलन, कचऱ्याची निर्मिती, कचरा प्रक्रिया आणि प्राथमिक पृथ्थक्करणाचे प्रमाण वाढले आहे. तथापि, शहरातील बाजारपेठ, सार्वजनिक शौचालय आणि ड्रेनेज, गटारी स्वच्छता ही फक्त 42 टक्के इतकी आहे, ही कारणेदेखील स्वच्छ सर्वेक्षणात घसरण होण्यास कारणीभूत ठरली आहेत, असे महापालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ऑगस्ट व सप्टेंबर 2024 मध्ये बेळगावात स्वच्छता सर्वेक्षण करण्यात आले. यासाठी केंद्रीय पथक महिनाभर बेळगावात होते. लोकांची मते आजमावण्यासह विविध ठिकाणी भेटी देऊन त्याची नोंद केली होती. याशिवाय जनमत सर्वेक्षणही करण्यात आले होते.
बैलहोंगल नगरपालिका सातव्या स्थानी
राज्यस्तरीय सर्वेक्षणात 2024-25 मध्ये बैलहोंगल नगरपालिकेने सातवा, गोकाक नगरपालिकेने 31 वा, सौंदत्ती नगरपालिका 52, कोन्नूर 67, रायबाग 77 आणि रामदुर्ग 93 वे स्थान पटकाविले आहे. राज्यातील सर्वात स्वच्छ 100 शहरांच्या यादीत यांचा समावेश करण्यात आला आहे.
शहरातील कचरा समस्या जैसे थे…
शहरातील कचऱ्याची उचल आणि विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली जात आहे, असे महापालिकेकडून सांगितले जात आहे. मात्र, सध्या शहरातील परिस्थिती पाहता जिकडेतिकडे कचऱ्याचे ढिग पडल्याचे दिसून येत आहेत. मात्र कोणत्या निकषांवर बेळगाव महापालिकेची स्वच्छ शहरांमध्ये निवड करण्यात आली आहे, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. रविवारी सकाळी कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांतून कॉलेजरोडवर कचरा मोठ्याप्रमाणात सांडला होता. पण त्याची उचल करण्यात आली नाही. कचऱ्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिक व वाहनचालकांना दुर्गंधीचा सामना सहन करावा लागला. त्यामुळे मनपाच्या या भोंगळ कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.









