प्रवाशांचा प्रतिसाद, बस सुसाट : यात्रेतून समाधानकारक महसूल मिळण्याची अपेक्षा
बेळगाव : मोहनगा (दड्डी) येथील भावेश्वरी यात्रेला सोमवारपासून प्रारंभ झाला. या पार्श्वभूमीवर परिवहनने बेळगाव-मोहनगा या मार्गावर यात्रेसाठी विशेष बस सुरू केली. या बसला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्या दिवशी मध्यवर्ती बसस्थानकातून 30 हून अधिक बस मोहनगा दड्डी) येथे धावल्या. दरम्यान, बुधवारपर्यंत चालणाऱ्या या यात्रेतून समाधानकारक महसूल मिळेल, अशी आशा परिवहनने ठेवली आहे.
मोहनगा (ता. हुक्केरी) येथील श्र्री भावेश्वरी देवीची यात्रा तीन दिवस म्हणजे बुधवारपर्यंत चालणार आहे. या काळात देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असते. शिवाय बेळगावसह महाराष्ट्र आणि कोकणातील भक्त अधिक संख्येने दाखल होतात. दरम्यान, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ही विशेष बससेवा सुरू करण्यात आली आहे. उळवी, मायाक्का चिंचली, सौंदत्ती यल्लम्मा व दड्डी येथील भावेश्वरी यात्रेला प्रारंभ झाला आहे. परिवहनने भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी जादा बसची व्यवस्था केली आहे. सोमवारी मोहनगा दड्डीसाठी 30, सौंदत्ती यल्लम्मासाठी 3 आणि उळवी यात्रेसाठी 9 बस धावल्या. विशेषत: दड्डी येथील भावेश्वरी यात्रेसाठी सर्वाधिक म्हणजे 30 बस धावल्या. मंगळवारी यात्रेचा मुख्य दिवस असल्याने जवळजवळ 50 हून अधिक बस धावतील, असा अंदाज परिवहनने वर्तविला आहे. कोरोनाच्या संकटामुळे मागील दोन वर्षात यात्रा-जत्रांवर निर्बंध घालण्यात आले होते. मात्र यंदा यात्रा-जत्रा पूर्ववत सुरू झाल्या आहेत. त्यामुळे भाविकांची संख्या वाढू लागली आहे. बेळगाव, संकेश्वर आणि हत्तरगी बसस्थानकांतून मोहनगा दड्डीकडे बस धावत आहेत. बेळगाव-मोहनगा (दड्डी) प्र्रत्येकी 70 रू. तिकीट दर आहे.









