प्रतिनिधी /इस्लामपूर
येथील पोलीस परेड ग्राऊंडवर निशिकांतदादा स्पोर्टस फाउंडेशनच्या वतीने झालेल्या राज्यस्तरीय सुवर्ण हॉकी चषक स्पर्धेत बेळगांवच्या मराठा लाईट इन्फंट्री आर्मी संघाने विजेतेपद पटकावले. या संघाने कोल्हापूर पोलीस संघाचा अंतिम सामन्यात 3-2 या गोल फरकाने पराभव केला. विजेत्या व उपविजेत्या संघांना निशिकांतदादा राज्यस्तरीय सुवर्ण चषक व रोख रक्कमेचे पारितोषिक पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते देण्यात आले.
अंतिम सामन्याच्या सुरुवातीच्या पहिल्या 10 व्या मिनिटाला कोल्हापूर पोलिस संघाच्या मुकुंद रजपूत याने एक गोल नोंदवला. 20 व्या मिनिटाला बेळगांवच्या करण लकीस याने गोल करुन बरोबरी साधली. तर 27 व्या मिनिटाला बेळगावच्या अक्षय खोत याने एका गोलची भर टाकून आघाडी घेतली. दरम्यान कोल्हापूर संघाच्या विनोद मनुगडे या खेळाडूने 47 व्या मिनिटाला गोल नोंदवून सामन्याची उत्कंठा वाढवली. शेवटचे 3 मिनिटे शिल्लक असताना बेळगावच्या तालीब शहा याने एक गोल करुन संघाचा विजय निश्चित केला. या सामान्याचा शुभारंभ सांगली जिल्हा भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष पै.रोहीत पाटील, उद्योजक अमोल पाटील, वैभव जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.
या स्पर्धा प्रकाश झोतात झाल्या. स्पर्धेत 12 संघांनी सहभाग घेतला होता.विजेत्या बेळगांव मराठा लाईट इन्फंट्री आर्मी संघाला रोख रुपये 51 हजार रुपये व निशिकांतदादा राज्यस्तरीय सुवर्ण हॉकी चषक व कोल्हापूर पोलीस कोल्हापूर या उपविजेत्या संघास रोख रुपये 33 हजार रुपये व निशिकांतदादा राज्यस्तरीय सुवर्ण चषक देण्यात आला. उपांत्य फेरीतील सामन्यात बेळगावने हुबळी इलेव्हनला तर कोल्हापूर पोलीस संघाने पेठ वडगावच्या देवगिरी स्पोर्टसला नमवले होते. या सामन्यात मॅन ऑफ दि मॅच बेळगाव संघाच्या संकेत पाटील, बेस्ट गोलकिपर बेळगांव संघाच्या रोशन पाटील, बेस्ट डिफेन्स कोल्हापूर पोलीस संघाच्या संदीप सावंत, बेस्ट हाफ बेळगांव संघाच्या सौरभ पवार, मॅन ऑफ दि टुर्नामेंन्ट बेळगांव संघाच्या तालीब शहा यांना प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. अंतिम सामन्यासाठी पंच म्हणून सागर जाधव, विजय पाचाळ यांनी तर टेक्निकल पंच म्हणून विवेक काळे काम पाहिले.
पारितोषिक वितरण प्रसंगी खा.संजय पाटील, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील, निशिकांतदादा स्पोर्टस फाऊंडेशनचे संस्थापक अजित पाटील, माजी नगरसेवक वैभव पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी डॉ.संपत खिलारी, तहसीलदार प्रदीप उबाळे उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक अशोक जाधव यांनी केले. स्पर्धेचे संयोजन संदीप थोरात, धनंजय राऊत, अमोल खोत, जयदीप निकम, ऍड.सुयोग पाटील, अतुल मोरे, अनिल शिंदे, सिद्राम मंगानुर, संतोष जाधव, दत्ता पाटील, बाजीराव भोसले, उदय पाटील, जालिंदर कुटे, विश्वजीत पाटील, अतुल पाटील, अभिजीत कारंजकर ,शशीकांत सुवासे, सचिन पाटील, संतोष पाटील, अनिल थोरात, विक्रम कळसे, विकास परीट, निलेश कांबळे, रवि जाधव आदि मान्यवर उपस्थित होते.









