यात्रेसाठी विशेष बस : प्रवाशांचा प्रतिसाद
बेळगाव : वाडी रत्नागिरी, कोल्हापूर येथील चैत्र जोतिबा यात्रेसाठी बेळगाव-जोतिबा मार्गावर थेट बससेवा सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारी पहिल्याच दिवशी बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकातून जोतिबाकडे सात बसेस धावल्या. त्याबरोबरच बेळगाव-कोल्हापूर मार्गावर यात्रेसाठी अतिरिक्त बस सोडण्यात आल्या आहेत. कोल्हापूर येथील जोतिबा चैत्र यात्रेसाठी जाणाऱ्या भक्तांची संख्या मोठी आहे. दरम्यान प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहनने बेळगाव-जोतिबा मार्गावर थेट बससेवा सुरू केली आहे. शहरासह ग्रामीण भागातून जोतिबा यात्रेसाठी जाणाऱ्या भक्तांची संख्या अधिक आहे. या भक्तांना ही बससेवा सोयीस्कर ठरणार आहे. बेळगाव ते जोतिबा 250 रुपये प्रति व्यक्ती तिकीट आकारणी केली जात आहे. शिवाय या यात्रा विशेष बसमध्ये महिलांनाही तिकीट आकारले जात आहे. पुढील दोन दिवस ही विशेष बससेवा धावणार आहे.
आगाऊ बुकिंग सेवा सुरू
शनिवारी या यात्रेचा मुख्य दिवस असल्याने बेळगाव येथून मोठ्या प्रमाणात भक्त जोतिबाकडे दाखल झाले आहेत. त्याबरोबर शनिवारी आणि रविवारीही भक्त जोतिबाला जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर परिवहनकडून विशेष बसची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या बरोबर बसस्थानकात आगाऊ बुकिंग सेवाही सुरू करण्यात आली आहे. तसेच ऑनलाईन तिकीट सेवाही उपलब्ध आहे. बेळगाव-जोतिबा विनाथांबा बससेवेला प्रवाशांचा प्रतिसादही मिळू लागला आहे.









