स्टार एअर कंपनीकडून बुकिंगला सुरुवात : 50 आसन क्षमता असणारे एअरक्राफ्ट वाहतूक करणार
बेळगाव : स्टार एअर विमान कंपनीने ‘उडान’ योजनेंतर्गत बेळगाव-जयपूर व बेळगाव-बेंगळूर या मार्गांवर विमानफेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दि. 15 मे पासून या विमानफेऱ्या सुरू होणार असून यासाठीचे बुकिंगही सुरू करण्यात आले आहे. मागील अनेक दिवसांपासून बेळगाव-जयपूर विमानफेरीची मागणी होत होती. अखेर ती येत्या काही दिवसांत पूर्ण होणार आहे. बेळगाव-जयपूर-बेळगाव ही विमानफेरी सोमवार, बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस असणार आहे. दुपारी 12.55 वाजता बेळगावमधून निघालेले विमान 3.10 वाजता जयपूरला पोहोचणार आहे. तर दुपारी 3.40 वाजता जयपूर येथून निघालेले विमान सायंकाळी 5.55 वाजता बेळगावला पोहोचेल. 50 आसन क्षमता असणारे एअरक्राफ्ट या दरम्यान वाहतूक करेल. बेंगळूर-बेळगाव-बेंगळूर या मार्गावर सोमवार, बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस सेवा दिली जाणार आहे. सकाळी 11.25 वाजता बेंगळूर येथून निघालेले विमान 12.30 वाजता बेळगावला पोहोचेल. तर सायंकाळी 6.20 वाजता बेळगावमधून निघालेले विमान रात्री 7.30 वाजता बेंगळूरला पोहोचेल. मागील अनेक दिवसांपासून बेळगाव विमानतळावरील सेवा रद्द होत असताना बऱ्याच दिवसांनी नवीन सेवा सुरू होत आहे. जयपूर शहराला जाणाऱ्यांची संख्या अधिक असल्यामुळे या विमानफेरीला उत्तम प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. बेळगाव परिसरात राजस्थानी समाज मोठ्या संख्येने असून त्यांना या फेरीचा फायदा होईल. बेंगळूर शहराला दररोज दोन विमानफेऱ्या असल्या तरी प्रवाशांची संख्या अधिक असल्यामुळे आणखी एक अतिरिक्त फेरीचा प्रवाशांना उपयोग होणार आहे.









