प्रतिनिधी / बेळगाव :
स्वराज्य, स्वदेशी आणि राष्ट्रीय शिक्षण हे प्रमुख मुद्दे घेवून लोकमान्य टिळक स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. टिळकांच्या विचारांचा बेळगावमध्ये मोठा प्रभाव होता. त्यामुळे कना&टक सिंह म्हणून ओळख असणारे गंगाधरराव देशपांडे यांच्या नेतृवाखाली टिळकांच्या विचारांनी एक फळी तयार झाली होती. पहिले स्वदेशी स्टोअर हे बेळगावच्या गणपतगल्ली येथे उघडण्यात आले. याचबरोबर गणेश राष्ट्रीय विद्यालय त्या काळी सुरू करण्यात आले होते. टिळकांच्या हस्ते झेंडा चौक येथे पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. त्यामुळे टिळक जरी पुण्याचे असले तरी त्यांची बेळगाव ही कर्मभूमी ठरली असे प्रतिपादन डॉ. एस. पी. सुरेबानकर यांनी केले.
राणी पार्वतीदेवी पदवीपूर्व कॉलेज आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजतर्फे मंगळवारी ‘क्रांती दिवस’ साजरा करण्यात आला. यावेळी ‘बेळगाव जिल्हय़ातील स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान’ या विषयावर प्रा. डॉ. एस. पी. सुरेबानकर बोलत होत्या. व्यासपिठावर स्वातंत्र्यसैनिकांचे वारसदार सुभाष कुलकर्णी, सोसायटीचे व्हा. चेअरमन एस. वाय. प्रभू, आरपीडी कॉलेजच्या व्यवस्थापन काfमटीच्या सदस्या लता कित्तूर उपस्थित होत्या.