सुवर्णसौध आवारात म. गांधींच्या पुतळ्याचे अनावरण
बेळगाव : देशात संविधान व लोकशाही नसती तर देश दिशाहिन राहिला असता, देशात अराजकता माजली असती. संविधानामुळे समाजाला शिस्त लागली. लोकशाहीमुळे सर्वांना समान हक्क, समान अधिकार मिळाले. महात्मा गांधी यांनी 1924 मध्ये बेळगावात झालेल्या काँग्रेस अधिवेशनात अस्पृश्यता निवारणासाठी आवाहन केले होते. त्यामुळे आज बेळगाव भूमीला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. आता 100 वर्षानंतर बेळगावात काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होत असून या शहराला आणखीनच महत्त्व प्राप्त झाले असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले. महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली बेळगावात 1924 मध्ये झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त सुवर्णसौध आवारात महात्मा गांधी यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. चरखा फिरवून पुतळ्याचे अनावरण खर्गे यांच्या हस्ते मंगळवारी झाले. याप्रसंगी मल्लिकार्जुन खर्गे बोलत होते.
सुवर्णसौध आवारात उभारलेला महात्मा गांधींचा पुतळा हा केवळ या भागालाच नव्हे तर संपूर्ण राज्याला प्रेरणादायी ठरला आहे. आता गुलबर्गा येथेही गांधीजींच्या विशेष पुतळ्याची स्थापना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेत 100 वर्षांपूर्वी म्हणजे 2024 मध्ये बेळगावात झालेल्या काँग्रेस अधिवेशनाची शताब्दी आज बेळगावात होत असून शहराला ही अभिमानास्पद बाब आहे. गांधीजींनी अस्पृश्यता निवारण, समता, ग्रामीण विकास, महिला सबलीकरणासाठी प्रयत्न केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा गांधीजींच्या तत्त्वांचा राज्यघटनेत वापर केला आहे. यावरुन महात्मा गांधीजींच्या थोर विचारांची कल्पना येते. आज राज्य घटनेचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न सुरू असून त्याला विरोध दर्शवून प्रयत्न हाणून पाडणे गरजेचे आहे. युवावर्गात व पुढील पिढीपर्यंत गांधीजींची विचारधारा पोहोचविण्याच्या उद्देशाने पुतळा उभारण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
प्रास्ताविकात विधानसभेचे अध्यक्ष यु. टी. खादर यांनी, बेळगावातील अधिवेशन म्हणजे एक ऐतिहासिक क्षण आहे. हा केवळ गांधीजींचा पुतळा अनावरण कार्यक्रम नव्हे तर स्वातंत्र्ययोद्ध्यांचा गौरव, संविधानाचा आदर करणे असे पवित्र कार्य आहे, असे सांगितले. महात्मा गांधीजींच्या विचारांवर उजळणी करणे हा या कार्यक्रमामुळे योग जुळून आला आहे. गांधीजींचे विचार बाजूस करून बलशाही भारत निर्माण करणे अशक्य आहे. यासाठी गांधीजींचे विचार, उपदेश जाणून घेऊन त्याप्रमाणे मार्गक्रमण करणे यात देशाचा विकास आहे. रामराज्य व ग्रामराज्य ही महात्मा गांधीजींची स्वप्ने होती. त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी मैत्री, बंधुभाव, एकमेकांबद्दल आदर ठेवणे गरजेचे आहे, असे खादर म्हणाले.
कायदा-संसदीय व्यवहार व पर्यटन खात्याचे मंत्री एच. के. पाटील यांनीही विचार मांडले. महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे अनावरण हा एक अविस्मरणीय क्षण आहे. हा पुतळा नसून प्रेरणा देणारे स्थान आहे. गांधीजींच्या अनुयायांनी हे लक्षात घ्यावे. विधानपरिषद सभापती बसवराज होरट्टी, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, गृहमंत्री जी. परमेश्वर, सार्वजनिक बांधकाम व पालकमंत्री सतीश जारकीहोळी, रुद्रण्णा लमाणी, काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल, रणदीपसिंग सुरजेवाला, जयराम रमेश यांसह राज्यातील मंत्री, आमदार, खासदार, माजी आमदार तसेच विविध पक्षनेते, नागरिक समारंभाला उपस्थित होते.
गदग विद्यापीठाचे नामकरण
गदग येथील विद्यापीठाचे महात्मा गांधी ग्रामीण विकास-पंचायतराज विद्यापीठ असे नामकरण व मुद्रेचे अनावरण या समारंभात करण्यात आले. यावेळी कुलगुरु डॉ. सुरेश नाडगौडर उपस्थित होते.
‘गांधी भारत’ विशेष टपाल लखोटा
याच समारंभात काँग्रेस शताब्दी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ‘गांधी भारत’ विशेष टपाल लखोट्याचे अनावरण करण्यात आले. माहिती आणि सार्वजनिक संपर्क खात्याच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन यावेळी झाले. महात्मा गांधी पुतळा अनावरणानंतर फटाक्यांची आतषबाजी झाली.









