बेळगाव :
बेळगाव विभागीय जीएसटी इंटिलीजन्स महासंचनालयाच्यावतीने मेटल स्क्रॅप क्षेत्रातील 21.64 कोटी रु. जेएसटी फसवणूक उघडकीस आणली आहे. जीएसटी विभागाने हरीहर व दावणगेरी येथील मरीयम स्क्रॅप डिलर्सकडे चौकशी केली असता तपासात 112 कोटी रु. बनावट पावत्या उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणात 21.64 कोटी रुपयांची जीएसटी फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे.
बनावट बिलांच्या आधारे इनपूट टॅक्स क्रेडिटचा (आयटीसी) चुकीचा वापर केल्याची कबुली देण्यात आली आहे. रिव्हर्स चार्ज मेकॅनिझमअंतर्गत 4.50 कोटी रुपयांचा जीएसटी कमी भरण्यात आला. करदात्याने मोठ्या प्रमाणात मेटल स्क्रॅप नेंदणीकृत नसलेल्या पुरवठादाराकडून खरेदी केले होते. बनावट संस्थांकडून खरेदी झाल्याची कागदपत्रेही तपासात उघडकीस आली होती. कंपनीचे प्रमुख मोहम्मद सकलेन यांच्यावर बेळगाव जीएसटी विभागाने शुक्रवारी गुन्हा नोंद करून त्यांना ताब्यात घेतले. बेळगावच्या जेएमएफसी न्यायालयात हजर केले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.









