अर्धवट रस्ता कामामुळे कणबर्गीत शेतकरी-ग्रामस्थांकडून रास्तारोको : पोलिसांची मध्यस्थी
बेळगाव : कणबर्गी येथील मुख्य रस्त्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीपर्यंतचा रस्ता उखडून टाकण्यात आला आहे. त्यामुळे ये-जा करणे अवघड जात आहे. हा रस्ता करावा, यासाठी अनेकवेळा मागणी करण्यात आली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे कणबर्गी येथील शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी सोमवारी रास्तारोको केला. यामुळे बराच गोंधळ उडाला. अखेर पोलीस दाखल होऊन शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन रास्तारोको थांबविला. शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश करण्यात आला. कणबर्गी हे गाव स्मार्ट सिटीमध्येच येते. मात्र या गावाकडे नेहमीच दुर्लक्ष करण्यात आले आहे. योग्यप्रकारे विकासकामे करण्यात आली नाहीत. बहुसंख्य कामे अर्धवटच ठेवण्यात आली आहेत. गावामध्ये प्रवेश करणारा मुख्य रस्ताच खोदून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे ये-जा करणे अवघड जात आहे. विशेषकरून शेतकऱ्यांसाठी हे त्रासाचे ठरत आहे. याबाबत अनेकवेळा निवेदने दिली. तरीदेखील दुर्लक्ष करण्यात आले.
कणबर्गी गावातील संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रस्ते अडवून मुख्य रस्त्यावर रास्तारोको केला. यामुळे मोठा गोंधळ उडाला. रास्तारोको करताना मोठे टायरदेखील पेटविण्यात आले. त्यामुळे पोलिसांनीही शेतकऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. तुमची मागणी निवेदनानुसार करा. अशाप्रकारे जनतेला वेठीस धरून नाहक त्रास देण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा तुमच्यावर गुन्हे दाखल करू, असा इशारा दिला. यावेळी शेतकऱ्यांनीही आम्ही कित्येक महिने झाले रस्ता करावा, अशी मागणी करत आहे. मात्र कंत्राटदार दुर्लक्ष करत असल्याचे सांगितले. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला, अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी यावेळी दिल्या आहेत. रास्तारोकोमुळे गोकाक रोडवरील वाहतूक काहीवेळ ठप्प होती.
‘तो’ मातीचा ढीग हटवा
धर्मवीर संभाजी चौकामध्ये मातीचा ढीग टाकण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तसेच ग्रामस्थांना ये-जा करणे कठीण झाले आहे. मातीचा ढीग टाकून रस्ता अडविण्यात आला आहे. त्यामुळे साऱ्यांनाच फेरा मारून जावे लागत आहे. तेव्हा तो मातीचा ढीग हटवावा, अशी मागणी कणबर्गी येथील काही ग्रामस्थांनी केली आहे.









