वार्ताहर / कणकुंबी
गोव्याहून बेळगावकडे जाणाऱया कँटर चालकाचा भरधाव वाहनावरील ताबा सुटल्याने कालमणीजवळील भटवाडा येथील वळणावर कँटर पलटी होऊन एक जण गंभीर जखमी तर दोघेजण किरकोळ जखमी झाल्याची घटना शनिवारी संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास घडली.
बेळगाव-गोवा अशी दररोज दुधाची वाहतूक करणारा कँटर क्रमांक केए 22 सी 6314 हा गोव्याहून बेळगावच्या दिशेने जात असताना कालमणीजवळील भटवाडा वळणावर आला असता वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे चालकाने ब्रेक मारला. त्यामुळे कँटर रस्त्यावरच आडवा झाला. सदर अपघामुळे बेळगाव-पणजी वाहतूक जवळपास अडीच तास ठप्प झाली होती. दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सदर घटनेची माहिती जांबोटी पोलिसांना मिळताच जांबोटी ओपीचे पोलीस नन्हेखान यांनी घटनास्थळी पाहणी करून जखमींना रुग्णवाहिकेतून बेळगावला पाठविले. त्यानंतर रस्त्यावरील कँटरला जेसीबीच्या साहाय्याने बाजूला करून वाहतुकीला मार्ग मोकळा केला. सुमारे अडीच तास ठप्प झालेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांची तारांबळ उडाली. अपघातात जखमी झालेल्या चालकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.









