बेटणे ते पारवाड क्रॉसदरम्यानच्या रस्त्यावर ट्रक बंद पडल्याने कोंडी
वार्ताहर / कणकुंबी
बेळगाव-चोर्ला पणजी (गोवा) या रस्त्याची सध्या दयनीय अवस्था झालेली आहे. या मार्गावर दररोज वाहतुकीची कोंडी होत असून सदर रस्ता म्हणजे वाहनधारक व प्रवाशांसाठी जणू मृत्यूचाच सापळा बनला आहे. शुक्रवारी रात्री एक ते दीडच्या दरम्यान अवजड वाहतूक करणारा ट्रक इंजिनमध्ये बिघाड होऊन बेटणे ते पारवाड क्रॉस दरम्यानच्या रस्त्यावर चढतीला थांबल्याने शनिवारी सकाळी दहा वाजेपर्यंत संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती.
चार दिवसांपूर्वी कालमणी गावाजवळ दोन झाडे रस्त्यावर कोसळल्याने बेळगाव- गोवा वाहतूक सुमारे आठ तास ठप्प होऊन प्रवासीवर्गाचे अतोनात हाल झाले होते. तशाच प्रकारे पुन्हा एकदा शुक्रवार 12 रोजी रात्रीपासून ते शनिवारी सकाळपर्यंत बेळगाव-गोवा अशी वाहतूक पुन्हा एकदा ठप्प होऊन प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला जवळपास दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जांबोटीच्या बाजूला बेटणे गावाच्या धाब्यापर्यंत तर चोर्ल्याच्या बाजूला कणकुंबीपर्यंत अनेक वाहने अडकून पडली होती.
गोवा हद्दीपर्यंतच्या रस्त्याची अक्षरशः चाळण
बेळगाव-गोवा मार्गावर कुसमळीपासून ते गोवा हद्दीपर्यंत रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून काही ठिकाणी तर भले मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. कणकुंबी भागातील समस्यांच्या बाबतीत प्रशासन निद्रिस्त असून लोकप्रतिनिधांचेही दुर्लक्ष झाले आहे. बेळगाव- चोर्ला पणजी रस्त्याबरोबरच या भागातील अप्रोच रस्ते, वीजसमस्या, जंगली प्राण्यांचा उपद्रव, ओसाड टाकलेली शेती व इतर अनेक समस्या आता गंभीर बनल्या आहेत. त्यामुळे जांबोटी, कणकुंबी भागाला आता कोण वाली आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या आठ दिवसांपासून कालमणीपासून ते चोर्लापर्यंत पथदीप बंद आहेत.
बेळगाव-चोर्ला पणजी मार्गावरील खड्डय़ांमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. रस्त्याची दुर्दशा झाल्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला आहे. वाहनधारकांना खड्डय़ांमधून मार्ग काढताना अपघातांना सामोरे जावे लागत आहे. जांबोटी ते चोर्ला या मार्गावरील खड्डय़ांमुळे बेळगाव -गोवा वाहतुकीबरोबरच स्थानिक नागरिकांनासुद्धा त्रास सहन करावा लागत आहे. मागील वषीही जांबोटी, कणकुंबी चोर्ला म्हणजे गोवा हद्दीपर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले होते. त्यावेळी जर रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम चांगले केले असते तर त्याच ठिकाणी पुन्हा खड्डे पुन्हा निर्माण झाले नसते. केवळ दगडमाती घालून काही ठिकाणचे खड्डे बुजवण्यात आले होते. तसेच काही ठिकाणी केवळ खडी घालण्यात आली होती. त्यामुळे यावषीसुद्धा पुन्हा त्याच ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने वाहतुकीवर परिणाम होत आहे. खड्डय़ांमुळे वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. तर काही ठिकाणी अपघातही होत आहेत. खड्डेमय रस्त्याचा फटका चारचाकी वाहनांना अधिक प्रमाणात बसत आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले असून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पावसाळय़ापूर्वी हाती घेतले असते तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती, अशा प्रतिक्रिया वाहनचालकांमधून व्यक्त करण्यात येत आहेत.
विशेषतः जांबोटीपासून ते चोर्लापर्यंत रस्त्यावर मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. कालमणीच्या बसस्टॉपवर असलेला भला मोठा खड्डा अतिशय धोकादायक बनला होता. कालमणी ग्रामपंचायत सदस्य सुनील नाईक व इतर युवकांनी तो बुजविला आहे. त्याचप्रमाणे चिखले ते बेटणे दरम्यान, तसेच बेटणे ते कणकुंबी आणि चोर्ला दरम्यान रस्त्यावर पडलेले खड्डे वाहतुकीला मोठा अडथळा ठरत आहेत.
रस्त्याच्या दुरुस्तीचे काम त्वरित हाती घ्या
बेळगाव ते साखळीपर्यंतच्या 69 किलोमीटर रस्त्यासाठी केंद्र सरकारने 229 कोटी रुपये मंजूर केलेले असून या रस्त्याचे दुपदरीकरणाचे काम पावसाळय़ानंतर सुरू करण्याची शक्मयता आहे. त्यासाठी बेटणे गावाजवळ कंत्राटदाराने साहित्याची जुळवाजुळव करून तयारी सुरू केलेली आहे. हॉट मिक्सिंगसाठी लागणारी यंत्रसामग्री आणलेली असून पावसाळय़ानंतर रस्त्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. परंतु सद्यस्थितीत या रस्त्यावरून वाहने चालवणे धोकादायक बनलेले असून संबंधित अधिकाऱयांनी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम त्वरित हाती घ्यावे, अन्यथा स्थानिक नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे.









