बेळगाव-वास्को एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी
बेळगाव : पावसाळ्याच्या दिवसात बेळगाव-गोवा मार्गावरील रस्त्यांची पडझड झाल्यानंतर वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. गोव्यातील अनेक ग्राहक खरेदीसाठी बेळगावमध्ये येत असतात. तसेच उद्योग-व्यापाराच्या दृष्टीनेही दोन शहरांमध्ये देवाणघेवाण सुरू असते. त्यामुळे बेळगाव-वास्को एक्स्प्रेस पुन्हा सुरू केल्यास रोड बंद झाला तरी वाहतूक सुरू राहण्यास मदत होणार आहे. बेळगाव-रामनगर-गोवा हा रस्ता मागील अनेक दिवसांपासून रखडला आहे. केंद्रीय वनविभागाने परवानगी नाकारल्याने हा रस्ता अर्धवट स्थितीत आहे. यामुळे ठिकठिकाणी 2 ते 3 फूट खड्डे पडले असून या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी भरल्याने अवजड वाहने अडकून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. यामुळे सर्व वाहतूक चोर्ला रोडमार्गे वळविण्यात आली. परंतु, चोर्ला रोड हा अरुंद असल्याने या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होत असते. त्यातच झाडे कोसळणे, दरड कोसळणे, अपघात होणे असे प्रकार घडत असल्याने वरचेवर वाहतूक कोंडी होते.
रस्त्यांची अवस्था बिकट असल्यामुळे बेळगाव-वास्को या मार्गावर रेल्वे सुरू झाल्यास प्रवाशांना प्रवास करणे सोयीचे ठरणार आहे. बेळगावचे माजी खासदार कै. सुरेश अंगडी यांच्या प्रयत्नातून बेळगाव-वास्को अशी एक्स्प्रेस सुरू होती. परंतु, रेल्वे अधिकाऱ्यांनी या एक्स्प्रेसचे चुकीचे वेळापत्रक आखल्याने त्याला तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. तसेच काही दिवसातच एक्स्प्रेस बंद करावी लागली. बेळगाव व गोवा या दोन शहरांमधील देवाणघेवाण मोठी असल्यामुळे एक्स्प्रेस सुरू करणे गरजेचे आहे. बेळगाव-वास्को मार्गावर रेल्वे सुरू झाल्यास व्यापार-उद्योग क्षेत्रालाही उभारी मिळणार आहे. नैर्त्रुत्य रेल्वेने या सर्व बाबींचा विचार करून एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी प्रवासी तसेच व्यापारीवर्गातून होत आहे.









