क्रमवारीत एका अंकाने सुधारणा, गोगटे वाणिज्यची तन्वी पाटील राज्यात तिसरी : रायबाग तालुक्यातील कावेरी मल्लापुरे चौथी
बेळगाव : मागील पंधरा दिवसांपासून विद्यार्थ्यांना लागलेली उत्कंठा अखेर मंगळवारी दुपारी संपली. बारावीचा निकाल दुपारी एकच्या सुमारास वेबसाईटवर जाहीर झाला. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याचा निकाल 65.37 टक्के लागला असून राज्यात 26 व्या स्थानी समाधान मानावे लागले. बेळगावच्या गोगटे पीयु कॉलेजची विद्यार्थिनी तन्वी हेमंत पाटील हिने वाणिज्य विभागात 597 (99.5 टक्के) गुण मिळवून राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे.
परीक्षा मंडळाने सोमवारी सायंकाळी एका पत्रकाद्वारे मंगळवारी निकाल जाहीर केला जाईल, असे स्पष्ट केले होते. मंगळवारी निकाल जाहीर होताच वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड सुरू होती. सुरुवातीला काहीवेळ निकाल खुला होत नव्हता. परंतु, बऱ्याचवेळा प्रयत्न केल्यानंतर निकाल पाहता आला. निकाल समजताच अनेकांनी आपल्या सोशल मीडिया फ्लॅटफॉर्मवर स्टेटस ठेवण्यास सुरुवात केली. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 20 हजार 995 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 13 हजार 724 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामुळे बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याचा 65.37 टक्के निकाल लागला आहे. विज्ञान विभागाचा निकाल 74.65 टक्के, वाणिज्य विभागाचा 67.17 तर कला विभागाचा 54.46 टक्के निकाल लागला.
कला विभागात आरपीडी पीयुकॉलेजची विद्यार्थिनी महालक्ष्मी कुसगर हिने 588, दीपा बडीगेर (रामदुर्ग) हिने 583, कीर्ती लमाणी (मुनवळ्ळी) हिने 583, रुची राजपुरोहित (लिंगराज कॉलेज) हिने 583, रेणुका बिचगट्टी (रामदुर्ग) 582 गुण मिळविले. वाणिज्य विभागात तन्वी पाटील (गोगटे पीयु कॉलेज) 597, पूर्वी राजपुरोहित (गोगटे पीयु कॉलेज) 593, ब्राह्मी नरसगौडा (गोगटे पीयु कॉलेज) 590 गुण मिळविले. विज्ञान विभागात सृष्टी डिग्गाई (जीएसएस पीयु कॉलेज) 589, सानिया सनदी (आरएलएस पीयु कॉलेज) 589, सृष्टी अष्टेकर (आरएलएस पीयु कॉलेज) 588, श्रेयस काकडे (आरएलएस पीयु कॉलेज) 585 गुण मिळविले आहेत. पदवीपूर्व शिक्षण विभागाने या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.
यावर्षीही शहरी विद्यार्थ्यांचीच आघाडी
बारावी निकालात यावर्षीही शहरी विद्यार्थ्यांनी आघाडी घेतली. ग्रामीण भागातील 5 हजार 178 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 3003 उत्तीर्ण झाले. त्यामुळे त्यांची टक्केवारी 58 टक्क्यांपर्यंत पोहोचली. शहरी भागातील 15,817 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 10,721 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे 67.78 टक्के शहरी विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती पदवीपूर्व शिक्षण विभागाने दिली.
कावेरी मल्लापुरे राज्यात चौथी
चिकोडी जिह्यातील रायबाग तालुक्यातील निपनाळ येथील रहिवासी व सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयाची विद्यार्थिनी कावेरी पवाडी मल्लापुरे हिने 99 टक्के गुण मिळवून राज्यात चौथा क्रमांक मिळविला आहे.
निकाल वाढीसाठी सुरुवातीपासूनच प्रयत्न
बारावीचा निकाल वाढविण्यासाठी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच प्रयत्न सुरू केले होते. जिल्हा पंचायतीचे सीईओ राहुल शिंदे यांनी देखील निकाल वाढीसाठी सरकारी कॉलेजला भेटी दिल्या होत्या. यावर्षी निकालात थोड्याफार प्रमाणात वाढ झाली असून पुढील वर्षी अजून निकाल वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील.
-एम. एम. कांबळे (जिल्हा पदवीपूर्व शिक्षणाधिकारी)
तन्वीचे सीए होण्याचे स्वप्न : ‘तरुण भारत’ भेटीवेळी उलगडले यशाचे गमक
दहावीत थोडक्या गुणांनी राज्यात येण्याची संधी हुकल्याने अनगोळच्या तन्वी हेमंत पाटील हिने पीयूसीच्या पहिल्या दिवसापासूनच अभ्यासाला सुरुवात केली. सर्वसामान्य कुटुंबातील तन्वीने अभ्यासाचे योग्य प्रकारे नियोजन तर केलेच, त्याचबरोबर गोगटे पीयू कॉलेजच्या प्राध्यापकांनी योग्य मार्गदर्शन केल्याने आज तिने वाणिज्य विभागात राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. भविष्यात चार्टर्ड अकौंटंट होण्याची इच्छा तिने ‘तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केली. कोणत्याही कोचिंग अकॅडमीशिवाय तिने अभ्यासाला सुरुवात केली. दिवसभर कॉलेजमध्ये शिकविलेल्या अभ्यासक्रमाची उजळणी ती करत होती. इयत्ता आठवीमध्येच आपण चार्टर्ड अकौंटंट व्हायचे, ही इच्छा मनाशी पक्की करून ती अभ्यास करत होती.
दहावीला चांगले गुण असतानाही केवळ सीए होण्यासाठी तिने वाणिज्य शाखा निवडली. सध्याच्या घडीला सीए प्रोफेशन हे प्रतिष्ठेचे असल्याने त्यामध्येच करिअर घडवायचे, असे तिने निश्चित केले होते. वडील हेमंत पाटील यांचे मोटर वाईंडिंगचे दुकान असून आई संगीता गृहिणी आहेत. रात्री उशिरापर्यंत अभ्यास करताना तन्वीला आईची मदत व्हायची. अभ्यासाचे योग्य नियोजन करून त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने केल्यास हमखास यश मिळू शकते, असे तन्वीचे म्हणणे आहे. कॉलेजने शेवटच्या टप्प्यात बेंगळूरसह इतर मोठ्या शहरांतून मार्गदर्शक बोलावून मार्गदर्शन दिल्यामुळे गुणांमध्ये वाढ होण्यास मदत झाली.
तिच्या मेहनतीवर आमचा विश्वास
तन्वी ही सुरुवातीपासूनच मेहनती आहे. दहावीत तिला यशाने हुलकावणी दिली होती. परंतु, मागील दोन वर्षात तिने रात्रंदिवस घेतलेल्या मेहनतीचे तिला फळ मिळाले. आई-वडील म्हणून आम्हाला तिचा सार्थ अभिमान आहे. 99 टक्के तिची मेहनत आणि 1 टक्का तिचे नशीब यामुळेच हे यश मिळू शकले, असे तन्वीची आई संगीता यांनी सांगितले.









