बेळगाव : धारवाड येथे युवजन क्रीडा खाते व युवा सबलीकरण यांच्या संयुक्त विद्यमाने दसरा विभागीय शटल बॅडमिंटन स्पर्धेत बेळगावच्या महिला बॅडमिंटनपटूंनी अंतिम सामन्यात बेळगाव विभागीय संघाने धारवाड विभागीय संघाचा 3-0 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. म्हैसूर येथे होणाऱ्या दसरा राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. धारवाड येथे घेण्यात आलेल्या विभागीय शटल बॅडमिंटन स्पर्धेत महिलांच्या विभागात बेळगावचे प्रतिनिधीत्व करणारी तनिष्का कोरीशेट्टी, रिहा मंथेरो व शिवानी मालशेट्टी यांनी यश संपादन केले. महिला विभागात पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बेळगाव विभागीय संघाने हावेरी संघाचा 2-0 असा पराभव केला. त्यामध्ये तनिष्का कोरीशेट्टीने ऐश्वर्याचा 15-12, 15-9 तर दुहेरीत तनिष्का व रिहा या जोडीने ऐश्वर्या व अनुषा या जोडीचा 15-7, 15-4 अशा सेटमध्ये पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
अंतिम सामन्यात बेळगाव जिल्हा संघाने धारवाड जिल्ह्याचा 2-0 अशा फरकाने पराभव केला. एकेरीत तनिष्काने साचीचा 15-8, 11-15, 15-9 अशा सेटमध्ये पराभव केला. तर दुहेरीत तनिष्का व रिहा जोडीने साची व अंजना या जोडीचा 15-11, 15-9 अशा सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या बेळगाव संघाला व उपविजेत्या धारवाड विभागीय संघाला रोखरक्कम, प्रमाणपत्र व चषक देऊन गौरविण्यात आले. तनिष्का कोरीशेट्टी रिहा मंथेरो व शिवानी मालशेट्टी यांना बेळगाव जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे एनआयएस बॅडमिंटन प्रशिक्षक भूषण अणवेकर यांचे बहुमुल्य मार्गदर्शन तर सचिव अशोक पाटील यांचे प्रोत्साहन लाभत आहे. वरील संघ म्हैसूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. सोमवारपासून होणाऱ्या स्पर्धेसाठी हा संघ शनिवारी रवाना होणार आहे.









