अवघ्या तीन महिन्यात 50 लाख मानवदिवस काम
प्रतिनिधी/ बेळगाव
असंघटित कामगारांना काम मिळवून देणाऱ्या नरेगा योजनेत बेळगाव जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. जिल्ह्dयात केवळ तीन महिन्यात 50.77 लाखाहून अधिक काळ मनुष्यदिवस काम देऊन उद्दिष्ट साध्य केले आहे. या कामगिरीमुळे जिल्हा पंचायत, तालुका पंचायत व प्रशासनाचे कौतुक होत आहे. जि. पं. सीईओ हर्षल भोयर यांच्या नेतृत्वाखाली यश संपादन केले आहे.
राज्यात 48 लाख मनुष्यदिवस काम देऊन कोप्पळ जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर तर 46.52 दिवस मनुष्यदिवस काम देऊन रायचूर जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. गतवर्षी जूनमध्ये 36.33 लाख मनुष्यदिवस काम झाले होते. बेळगाव जिल्ह्यात 2023-24 सालासाठी 1.40 कोटी मनुष्यदिवस काम निर्माण करण्याचे उद्दिष्ट्या ठेवण्यात आले होते. एप्रिल, मे आणि जूनमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त दिवस काम झाले आहे. त्यामुळे राज्यात बेळगाव जिल्हा अव्वल ठरला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण उद्योग योजनेंतर्गत दररोज 1 लाख मानवदिवस काम निर्माण होत आहे. त्यामध्ये महिलांचा सहभाग 59 टक्के आहे.
गरिबांना आर्थिक पाठबळ देणारी योजना
नरेगा योजनेंतर्गत गोरगरीबांच्या हाताला काम मिळत असल्याने ही योजना आर्थिक पाठबळ देणारी ठरत आहे. जिल्ह्यात जलसंजीवनी योजनेंतर्गत गटारी, रस्ते, शेततलाव, वनतलाव, अमृततलाव यासह नाल्यांची खोदाई करून जलस्रोत वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यामुळे स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होऊ लागला आहे. पाऊस लांबणीवर पडल्याने शेतीतील कामे खोळंबली आहेत. या काळात रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामे मार्गी लावण्यात आली आहेत.
या योजनेला गती मिळाल्याने हजारो कामगारांना रोजगार मिळाला. शिवाय शासनाने मजुरीचा दर 309 रुपयांवरुन 316 रुपये केला आहे. त्यामुळे रोजगारांच्या कामासाठी कामगारांची संख्या वाढू लागली आहे. त्याबरोबर नरेगा कामगारांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. ग्राम आरोग्य अभियान राबवून वेळोवेळी आरोग्य तपासणी केली जात आहे.
जिल्हा पंचायत सीईओ हर्षल भोयर यांनी तालुक्यातील समन्वय आणि प्रशासकीय सहाय्यकांना बरोबर घेऊन गावोगावी भेटी दिल्या आहेत. कामगारांच्या समस्या ओळखून अधिककाळ मानवदिवस काम देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. शिवाय पथकाने गावांना भेटी देऊन कामगारांच्या समस्या सोडविण्याबरोबर अधिक दिवस रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
हर्षल भोयर (सीईओ, जिल्हा पंचायत)

गतवर्षीच्या तुलनेत यंदा 18.44 लाख मनुष्यदिवस जादा काम देण्यात आले आहे. विशेषत: महिलांचा सहभाग वाढला आहे. कामगार आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रयत्नामुळे हे यश प्राप्त झाले आहे. शिवाय 27 रोजी बेंगळूर येथे होणाऱ्या बैठकीत योजनेच्या प्रगतीचा अहवाल सादर केला जाणार आहे.









