चौथ्या मिनी ऑलिम्पिक राज्यस्तरीय आंतरजिल्हा 14 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धा : बेळगाव फुटबॉल संघाचे वर्चस्व
बेळगाव : बेंगळूर येथे चौथ्या मिनी ऑलिम्पिक राज्यस्तरीय आंतरजिल्हा 14 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेत बेळगाव जिल्हा संघाने आपल्या गटात दोन्ही सामन्यातून आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत गुणतालिकेत अव्वल स्थान मिळविले आहे. 14 वर्षांखालील मिनी ऑलिम्पिक फुटबॉल स्पर्धेतील झालेल्या पहिल्या सामन्यात बेळगाव जिल्हा संघाने म्हैसूर संघाचा 2-0 असा पराभव केला. 15 व्या मिनिटाला आराध्य नाकाडीच्या पासवर नवीन पाठकने गोल केला. दुसऱ्या सत्रात म्हैसूर संघाने आक्रमक चढाया सुरु केल्या. पण बेळगावच्या भक्कम बचाव फळीपुढे त्यांच्या चढाया असफल ठरल्या. दुसऱ्या सत्रातील 44 व्या मिनिटाला नवीन पाठकच्या पासवर शाहीदल्ली सय्यदने संघाचा दुसरा गोल केला. म्हैसूर जिल्हा संघाला आपले खाते शेवटपर्यंत उघडता आले नाही.मंगळवारी खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात बेळगाव जिल्हा संघाने मंड्या जिल्हा संघाचा 2-0 असा पराभव केला.
या सामन्याच्या 17 व्या मिनिटाला शाहीदल्ली सय्यदच्या पासवर आराध्य नाकाडीने गोल करून 1-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 48 व्या मिनिटाला बेळगावच्या नवीन पाटकच्या पासवर आराध्य नाकाडीने दुसरा गोल करून संघाला 2-0 असा विजय मिळवून दिला. या सामन्यात मंड्या संघाने गोल करण्यासाठी बरेच प्रयत्न केले. पण त्यांना अपयश आले. ब गटात सुरु असलेल्या सामन्यातील दक्षिण कनडा संघाने आपल्या दोन सामन्यात एक सामना जिंकून 4 गुण मिळविले असून हसन संघानेही 4 गुण मिळवित ब गटात दुसऱ्या स्थानावरती आहे. दावणगिरी संघ 3 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. ब गटात म्हैसूर संघाने एक सामन्यात विजय मिळवून 3 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. बेळगाव जिल्हा संघाचा तिसरा सामना धारवाड जिल्हा संघाशी असून जर हा सामना जिंकल्यास बेळगाव ब गटात अव्वल स्थानावर राहील आणि त्यांचा उपांत्य फेरीतील मार्ग मोकळा होईल.









