बेंगळूर येथे होणाऱया स्पर्धेसाठी बेळगाव संघ पात्र

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित कर्नाटक राज्य फुटबॉल संघटना मान्यताप्राप्त मिनी ऑलिम्पिक नॉर्थ झोन आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धेच्या शेवटच्या साखळी सामन्यात गतविजेता धारवाड जिल्हा संघाचा बेळगाव जिल्हा संघाने 6-2 अशा गोलफरकाने पराभव करुन बेंगळूर येथे होणाऱया आंतरजिल्हा विभागीय फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरला.
महांतेशनगर येथील लव्हडेल सेंट्रल स्कूलच्या टर्फ फुटबॉल मैदानावर खेळविण्यात आलेल्या शेवटच्या साखळी सामन्यात तिसऱया मिनिटाला नजीब इनामदारने पहिला गोल केला. 17 व्या मिनिटाला श्रीननच्या पासवर अमिल बेपारीने बेळगाव संघाचा दुसरा, 21 व्या मिनिटाला धारवाडच्या केविनच्या पासवर करविर पवारने गोल करुन 1-2 अशी बेळगावची आघाडी कमी केली. 37 व्या मिनिटाला करवीर पवारने दुसरा गोल करुन 2-2 अशी बरोबरी करीत सामन्यात रंगत निर्माण केली. दुसऱया सत्रात मात्र बेळगाव जिल्हा संघाने आक्रमक चढाया करीत आणखी चार गोल नोंदवले. 53 व्या मिनिटाला नजीब इनामदारने पेनल्टीवर गोल करुन बेळगावला 3-2 ची आघाडी मिळवून दिली. 66 व्या मिनिटाला बेळगावच्या श्रीननने, 77 व्या मिनिटाला अमिल बेपारीने, 82 व्या मिनिटाला कर्णधार नजीब इनामदारने गोल करत 6-2 ची आघाडी मिळवून देताना हॅट्ट्रिक साधली.. दुसऱया सत्रात धारवाडने अनेक चढाया केल्या. पण बेळगावचा गोलरक्षक कलघटगी व बचावफळीतील खेळाडूंनी धारवाडने केलेल्या चढाया परतावून लावल्या.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे लव्हडेल सेंट्रल स्कूलचे सभासद राज घाटगे, बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे पॅट्रन राम हदगल, संघटनेचे अध्यक्ष माजी नगरसेवक पंढरी परब, माजी सचिव उमेश मजुकर, अल्लाबक्ष बेपारी आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या बेळगाव जिल्हा व उपविजेत्या धारवाड जिल्हा संघाला चषक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. यावेळी बेळगाव जिह्याचे प्रशिक्षक शिरीश गणेशकर, धारवाड संघाचे प्रशिक्षक मारुती उत्तुरे, मतीन इनामदार आदी उपस्थित होते. या स्पर्धेसाठी पंच म्हणून मानस नायक, सुरज बालदार व श्रेयस बांदेकर, कौशिक पाटील यांनी काम पाहिले.









